कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ रविवारी (६ फेब्रुवारी) वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना खेळणार आहे. हा सामना भारताचा १००० वा एकदिवसीय सामना असणार आहे. १००० एकदिवसीय सामने खेळणारा भारत पहिलाच संघ देखील ठरला आहे. याचनिमित्ताने या लेखातून आपण भारताच्या एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासातील काही खास आकडेवारींवर नजर टाकू.
एकदिवसीयमधील सर्वोत्कृष्ट धावसंख्या व कमी धावा
भारताने ८ डिसेंबर २०११ ला इंदोर येथे वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठी धावसंख्या केली होती. त्या सामन्यात भारताने ८ गड्यांच्या गमावत ४१८ धावा केल्या होत्या. भारताची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात कमी धावसंख्या २००० मध्ये शारजाहमध्ये श्रीलंकेविरुद्ध केली होती. भारत केवळ ५४ धावा करु शकला होता.
भारताचा सर्वात मोठा विजय
एकदिवसीय क्रिकेटमधला आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय भारताने २००७ मध्ये बरमुडा विरुद्ध पोर्ट ऑफ स्पेनमध्ये मिळवला होता. तेव्हा भारताने २५७ धावांनी विजय साजरा केला होता. धावांच्या तुलनेतील भारताचा हा मोठा विजय आहे.
सर्वाधिक सामने, सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतके
भारताच्या सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक सामने खेळले आहेत. सचिनने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत ४६३ सामने खेळले असून १८४२६ धावा केल्या आहेत. सचिन एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज आहे. सचिनने ४९ शतके झळकावली आहेत. त्याने ९६ अर्धशतके झळककावली आहेत.
सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आणि सर्वाधिक विकेट्स
भारताच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक व्यक्तिगत धावसंख्या रोहित शर्माने केली आहे. रोहितने श्रीलंकेविरुद्ध २६४ धावांची खेळी खेळली होती. तसेच भारताकडून अनिल कुंबळेने वनडेमध्ये सर्वाधिक बळी घेतले आहेत. कुंबळेच्या नावावर वनडेमध्ये एकूण ३३४ विकेट्स आहेत.
गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी आणि विकेट
गोलंदाजीत सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी करण्याचा विक्रम स्टुअर्ट बिन्नीच्या नावावर आहे. बिन्नीने २०१४ मध्ये मीरपूरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात अवघ्या ४ धावा देत ६ गडी बाद करण्याचा विक्रम केला होता. झहीर खानच्या नावावर एका स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. २०११ च्या विश्वचषकात झहीरने एकूण २१ विकेट घेतल्या होत्या.
सर्वात जास्त धावा देणारा गोलंदाज
एकदिवसीयमधील सर्वात महागडा गोलंदाज ठरण्याचा विक्रम भुवनेश्वर कुमारच्या नावावर आहे. भुवीने २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मुंबई एकदिवसीय सामन्यात १०६ धावा दिल्या होत्या.
एकदिवसीय सामन्यांमध्ये यशस्वी यष्टीरक्षक
महेंद्रसिंग धोनीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक म्हणून ३१८ झेल आणि १२० स्टंपिंग असे सगळे मिळून ४३८ बळी घेतले आहेत.
एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक झेल
मोहम्मद अझरुद्दीनने आतापर्यंत सर्वाधिक झेल घेतले आहेत. अझरुद्दीनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण १५६ झेल घेतले. त्याचबरोबर मालिकेमध्ये सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम व्हीव्हीएस लक्ष्मणच्या नावावर आहे. लक्ष्मणने २००३-४ च्या व्हीबी मालिकेत सर्वाधिक १२ झेल घेतले होते.
सर्वोत्तम भागीदारीचा विक्रम
एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक भागीदारीचा विक्रम तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांनी केला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात हैदराबादमध्ये तब्ब्ल ३३१ धावांची भागीदारी केली होती.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यात कर्णधार
धोनीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. धोनीने २०० सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले. त्यापैकी भारताने ११० जिंकले आहेत, ७५ पराभूत झाला आणि ५ सामने बरोबरीचे झाले आणि ११ सामने अनिर्णित राहिले.
एकदिवसीय सामन्यांमध्ये हॅट्रिक
चेतन शर्मा, कुलदीप यादव, कपिल देव, मोहम्मद शमी या गोलंदाजांनी भारतासाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये हॅट्रिक घेतली आहे. कुलदीपने एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोनदा हॅट्रिक घेतली आहे.
एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात जलद शतक
विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात वेगवान शतक ठोकले होते. कोहलीने २०१३ साली जयपूर एकदिवसीय सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ ५२ चेंडूत शतक झळकावले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेत टीम इंडियाने ‘अशाप्रकारे’ लता मंगेशकर यांना वाहिली श्रद्धांजली
INDvsWI: भारताचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय, दीपक हुडाचे पदार्पण; ‘असे’ आहेत दोन्ही संघ






