इटलीच्या संघाने टी-२० विश्वचषकात नेपाळविरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला आहे. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात इटलीचा संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची ही पहिलीच वेळ आहे. नेपाळविरुद्धचा हा विजय इटलीसाठी विश्वचषक इतिहासातील पहिला विजय ठरला. इटलीसाठी हा सामना ऐतिहासिक होता कारण संघाने आपला विश्वचषकातील पहिलाच सामना १० गडी राखून जिंकला आहे. इटलीसाठी या सामन्यात दोन भावांच्या जोडीने धडाकेबाज फलंदाजी करत असा अद्भुत पराक्रम केला आहे, जो टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात यापूर्वी कधीही झाला नव्हता.
इटलीकडून क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या जस्टिन मोस्का आणि अँथनी मोस्का या दोन भावांनी इतिहास रचला आहे. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात शतकी भागीदारी करणारी ही दोन भावांची पहिलीच जोडी ठरली आहे. यापूर्वी अनेक देशांसाठी भावांच्या जोड्या टी-२० विश्वचषकात खेळल्या आहेत, परंतु अद्याप कोणालाही शतकी भागीदारी करता आली नव्हती.
नेपाळने दिलेल्या १२४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या जस्टिन मोस्का आणि अँथनी मोस्का यांनी तुफानी फलंदाजी केली. या दोघांनी मिळून नेपाळच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या आणि अवघ्या १२.४ षटकांतच इटलीला विजय मिळवून दिला.
जस्टिन मोस्काने या सामन्यात ४४ चेंडूंचा सामना करत ६० धावांची वादळी खेळी केली. या खेळीत त्याने १३६ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या, ज्यामध्ये ५ चौकार आणि ३ जबरदस्त षटकारांचा समावेश होता. दुसरीकडे, अँथनी मोस्काने या सामन्यात १९३.७५ च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडला. त्याने ३२ चेंडूंचा सामना करत ६२ धावांची आक्रमक खेळी खेळून इतिहास रचला. या खेळीत त्याने ३ चौकार आणि ६ उत्तुंग षटकार ठोकले. इटलीचा संघ या दोन भावांची ही भागीदारी कधीही विसरू शकणार नाही.





