भारतीय संघाचा सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्मा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. त्यातील एक विक्रम अतिशय खास आहे आणि म्हणूनच आजचा दिवस भारताचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मासाठी खूप विशेष आहे. त्याने आजच्याच दिवशी 8 वर्षांपूर्वी वनडे क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी केली होती. त्याने श्रीलंकेविरुद्ध 13 नोव्हेंबर 2014 मध्ये चौथ्या वनडे सामन्यात 264 धावांची द्विशतकी खेळी केली होती.
रोहित शर्मा (Rohit Sharma) याने 8 वर्षापूर्वी कोलकतामधील ईडन गार्डन्सवर खेळताना 173 चेंडूत 33 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने ही 264 धावांची खेळी केली होती.
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली होती. विशेष म्हणजे आजही त्याच्या या विश्वविक्रमाच्या जवळपास कोणीही येऊ शकलेले नाही. रोहितचे हे वनडेतील दुसरे द्विशतक होते. त्यामुळे तो वनडेमध्ये 2 किंवा त्यापेक्षा अधिक द्विशतके करणारा पहिला फलंदाज ठरला होता. त्याने त्याचे पहिले वनडे द्विशतकही 2013 ला नोव्हेंबरमध्येच केले होते.
#OnThisDay in 2014, Rohit Sharma went big!
The Indian opener smashed 264, the highest ever ODI score 🤯
The worst part? Sri Lanka dropped him when he was on 4 🤦 pic.twitter.com/E6wowdoGUL
— ICC (@ICC) November 13, 2019
4 धावांवर सोडला होता रोहितचा झेल
रोहितने जेव्हा 264 धावांची खेळी केली होती तेव्हा श्रीलंकेसाठी वाईट गोष्ट म्हणजे रोहित 4 धावांवर असताना त्याचा झेल सुटला होता. त्यामुळे रोहितला जीवदान मिळाले होते. श्रीलंकेच्या थिसरा परेराने भारतीय संघ फलंदाजी करत असताना 5 व्या षटकातील तिसर्या चेंडूवर रोहित शर्माचा झेल सोडला होता. त्यावेळी रोहित केवळ 4 धावांवर खेळत होता. या षटकात शामिंडा एरंगा गोलंदाजी टाकत होता.
रोहितने एरंगाच्या बाहेर जात असलेल्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला पण चेंडू बॅटला स्पर्श करून थर्ड मॅनच्या दिशेला गेला पंरतू, परेराकडून झेल सुटला आणि रोहितला जीवदान मिळाले.
सेहवागला मागे टाकत रोहित बनला 1 नंबर खेळाडू
रोहितने ही 264 धावांची खेळी करण्याबरोबरच विरेंद्र सेहवागच्या वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावा करण्याच्या विश्वविक्रमाला मागे टाकले होते. रोहितने 264 धावांची खेळी करण्याआधी सेहवागने 2011 मध्ये वनडेत 219 धावांची खेळी केली होती.
डावाच्या शेवटच्या चेंडूवर झेलबाद झाला रोहित
या सामन्यात भारताच्या डावाच्या शेवटच्या चेंडूवर रोहित नुवान कुलशेकरचा बळी ठरला. रोहितचा झेल कुलशेकराच्या गोलंदाजीवर माहेला जयवर्धनेने घेतला होता. रोहितने 264 धावांपैकी तब्बल 186 धावा चौकार आणि षटकार मारत केल्या होत्या.
रोहितच्या स्फोटक खेळीमुळे भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 404 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेचा डाव 43.1 षटकांत 251 धावांतच आटोपला आणि श्रीलंका संघ 153 धावांनी पराभूत झाला.
या सामन्यात भारताकडून रोहित व्यतिरिक्त विराट कोहलीने 66 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. तर श्रीलंकेकडून गोलंदाजी करताना अँजलो मॅथ्यूजने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या होत्या.
तसेच फलंदाजी करताना श्रीलंकेकडून मॅथ्यूजनेच सर्वाधिक 75 धावांची खेळी केली होती. त्याला लहिरु थिरिमन्नेने चांगली साथ दिली होती. थिरिमन्नेने 59 धावा केल्या होत्या. भारताकडून गोलंदाजी करताना धवल कुलकर्णीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच उमेश यादव, अक्षर पटेल आणि स्टुअर्ट बिन्नीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या होत्या.
Happy birthday, Hitman 🎂
As our champion @ImRo45 turns 32 today, we pull out his epic knock of 264, the highest individual ODI score ever. #HappyBirthdayRohit
Full video – https://t.co/upXYoN02fe pic.twitter.com/9tb1ykHq2u
— BCCI (@BCCI) April 30, 2019
रोहितने झळकावले आहेत 3 वेळा दुहेरी शतक
रोहित शर्मा हा जगातील एकमेव फलंदाज आहे ज्याने त्याच्या वनडे कारकीर्दीत एकदाच नव्हे तर तीन वेळा दुहेरी शतक झळकावले आहे . यापूर्वी त्याने 2 नोव्हेंबर 2013 रोजी बेंगळुरू येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध 209 धावा करत पहिले द्विशतक झळकावले होते. तसेच रोहितने तिसरे द्विशतक श्रीलंकेविरूद्ध मोहाली येथे 13 डिसेंबर 2017 रोजी 208 धावांची नाबाद खेळी करत केले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्रो कबड्डी: दिल्ली पुन्हा डिरेल! जयपूर, यूपी आणि बंगालचे दणदणीत विजय
हारलो म्हणून काय झालं, ऑस्ट्रेलियातून ‘एवढे’ कोटी घेऊन येणार भारतीय संघ; आकडा वाचून येईल आकडी