भुवनेश्वर। 14व्या हॉकी विश्वचषकात आज (29 नोव्हेंबर) अर्जेंटिना विरुद्ध स्पेन यांच्यामध्ये थरारक सामना झाला. कलिंगा स्टेडियमवर पार पडलेल्या अ गटामधील या पहिल्या सामन्यात अर्जेंटिनाने स्पेनवर 4-3 असा विजय मिळवला.
दोन्ही संघ विश्वचषकात आज आठव्यांदा समोरासमोर आले. अर्जेंटिनाच्या मझील्ली ऑग्स्टीन आणि पेईलाट गोंझेलो यांनी प्रत्येकी दोन गोल केले. तर स्पेनकडून गोंजालेज एनरिक, रुझ वसेंकने आणि रोमियो जोस्प यांनी प्रत्येकी एक गोल केला.
सात गोलचा पाऊस पडलेल्या या सामन्यात दोन्ही संघाच्या खेळाडूंनी आक्रमकपणे सुरूवात केली. यावेळी पहिल्या सत्रातच पाच गोल झाले. यावेळी तीन गोल करत अर्जेंटिना आघाडीवर राहिला.
सामन्याच्या 3ऱ्याच मिनिटाला स्पेनच्या एनरिकने गोल करत संघाचे खाते उघडले. तर त्याच्या पुढच्याच मिनिटाला अर्जेंटिनाच्या ऑग्स्टीन गोल करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला.
तसेच रोमियोने स्पेनकडून 14व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर संघासाठी दुसरा गोल केला. मात्र स्पेनची 2-1 आघाडी काही वेळच राहिली. कारण सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला अर्जेंटिनाकडून ऑग्स्टीन आणि ड्रॅग फ्लिकर पेईलाट गोंझेलो यांनी प्रत्येकी एक गोल करत संघाला पहिला सत्रात 3-2 अशी आघाडी मिळवून दिली.
दुसरे सत्र चालू झाले असता दोन्ही संघाच्या खेळाडूंनी लक्षवेधक खेळ केला. यामध्ये एकही गोल झाला नाही.
स्पेनच्या संघाने तिसऱ्या सत्रात आपला खेळ उंचावला. त्यांच्या रुझने 35व्या गोल करत सामना 3-3 असा बरोबरीत आणला. तसेच त्यांना या सत्रात पेनल्टी कॉर्नरची संधीही मिळाली होती. मात्र त्याचे गोलमध्ये रूपांतर करण्यात त्यांना अपयश आले.
शेवटच्या निर्णायक सत्रात दोन्ही संघांना अनेक संधी मिळाल्या. तर पेईलाटने 49व्या मिनिटाला त्याचा या सामन्यातील दुसरा गोल केल्याने अर्जेंटिनाला 4-3 अशी आघाडी मिळाली. सामना संपण्यास काही सेकंद बाकी असताना एनरिकने बरोबरी करण्याची संधी सोडली.
महत्त्वाच्या बातम्या:
–मिताली राजला टीम इंडियातून वगळण्याचे रमेश पोवार यांनी दिले स्पष्टीकरण
–आॅस्ट्रेलियाच्या १९ वर्षीय गोलंदाजाने घेतली किंग कोहलीची विकेट
–पुढील महिन्यात होणाऱ्या एमर्जिंग टीम्स एशिया कप स्पर्धेसाठी झाली टीम इंडियाची घोषणा