भुवनेश्वर। कलिंगा स्टेडियमवर झालेल्या 14व्या हॉकी विश्वचषकाच्या आजच्या पहिल्या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 3-0 असा मोठा विजय मिळवला. या विजयाने ऑस्ट्रेलियाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
या सामन्यातील ऑस्ट्रेलियाचे हे तीनही गोल शेवटच्या पंधरा मिनिटात आले. त्यांच्याकडून व्हिटॉन जेक, गोवर्स ब्लेक आणि वेयर कोरी यांनी प्रत्येकी एक गोल केला.
इंग्लंडला चीन विरुद्धच्या सामन्यात बरोबरीत समाधान मानावे लागले होते. त्यामुळे आज त्यांनी उत्तम सुरूवात करत ऑस्ट्रेलियाला रोखण्याचे प्रयत्न केले.
तसेच इंग्लंडच्या बॅरी मिडलटनला 12व्या मिनिटाला गोल करण्याची संधी होती. मात्र ऑस्ट्रेलियाचा गोलकिपर लॉवेल टायलरने तो अडवत त्यांना आघाडी घेण्यापासून रोखले.
पहिल्या सत्रात दोन्ही संघानी बरोबरीचा खेळ केल्याने कोणालाच गोल करता आला नाही. तर दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाल्या. मात्र इंग्लंडचा गोलकिपर जॉर्ज पिनेरने त्याच्या उत्कृष्ठ शैलीने ते दोन्ही पेनल्टी कॉर्नर गोल होण्यापासून वाचवल्या.
पहिल्या 45 मिनिटांमध्ये एकाही संघाला गोल करता आला नाही. तसेच दोन्ही संघाच्या गोलकिपरने गोल रोखत महत्त्वाची भुमिका बजावल्याने एकालाही मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर गोल करता आला नाही. त्याचप्रमाणे दोन्ही संघाला एकमेकांची बचावफळी तोडण्यात अपयश येत होते.
चौथे निर्णायक सत्र ऑस्ट्रेलियासाठी लाभदायक ठरले. या सामन्यातील पहिला गोल 47व्या मिनिटाला आला. ऑस्ट्रेलियाच्या जेकने हा गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. तर 3 मिनिटानंतर लगेचच ब्लेकने गोल करत सामना 2-0 असा पुढे नेला.
56व्या मिनिटाला स्वान मॅथ्यूच्या पासवर कोरीने या सामन्यातील तिसरा गोल करत संघाचा विजय पक्का केला. स्वानला त्याने केलेल्या उत्कृष्ठ पाससाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
ऑस्ट्रेलियाने या विश्वचषकात सलग दोन सामने जिंकत 6 गुण मिळवले आहे. यामुळे ते ब गटात पहिल्या स्थानावर असून त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
तसेच 7 डिसेंबरला साखळी फेरीतील ऑस्ट्रेलियाचा सामना चीन विरुद्ध तर इंग्लंड न्यूझीलंडशी भिडणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–सहा वर्षाच्या चिमुकल्याचा भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी आॅस्ट्रेलियन संघात समावेश
–देवासाठी क्रिकेट सोडलेला क्रिकेटर मुलासाठी करतोय पुनरागमन
–२०१९च्या आयपीएलपासून दिल्ली डेयरडेविल्स ओळखले जाणार या नवीन नावाने