भुवनेश्वर। आज(4 डिसेंबर) 14 व्या हॉकी विश्वचषकात ब गटाचे सामने रंगणार आहेत. यातील पहिला सामना गतविजेत्या आॅस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात संध्याकाळी 5 वाजता कलिंगा हॉकी स्टेडीयमवर होईल.
या सामन्यात जागतिक क्रमवारीत 7 व्या क्रमांकावर असणाऱ्या इंग्लंडला बलाढ्य आॅस्ट्रेलियाला रोखण्याबरोबरच या सामन्यातील पहिला विजय मिळवण्याचेही आव्हान असणार आहे. कारण या स्पर्धेत त्यांच्या चीन विरुद्ध झालेल्या सामन्यात बरोबरी झाली होती.
इंग्लंडला 17 व्या क्रमांकावर असणाऱ्या चीनने कडवी लढत दिली होती. त्यामुळे इंग्लंड आॅस्ट्रेलिया विरुद्ध मात्र खेळ उंचवावा लागणार आहे. तसेच स्पर्धेत टीकून रहाण्यासाठीही इंग्लंडला हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे.
इंग्लंडकडून चीनविरुद्ध मार्क ग्लेगोर्ने आणि लिआम अन्सेलने गोल केला होता. त्यामुळे या सामन्यातही त्यांच्याकडे लक्ष असेल.
त्याचबरोबर त्यांच्या संघातील मिडफिल्डर बॅरी मिडलटनचा ही चौथी विश्वचषक स्पर्धा आहे. तसेच त्यांचा अनुभवी खेळाडू अॅडम डीक्सोनच्याकडूनही चाहत्यांना चांगल्या कामगिरीची आपेक्षा असेल. त्याने इंग्लंडकडून 200 पेक्षा जास्त सामने खेळले आहेत.
त्याचबरोबर इंग्लंडचा गोलकिपर जॉर्ज पिनेर ही चांगल्या लयीत आहे. त्याला 2018 च्या सुलतान अझलान शहा कप स्पर्धेतील सर्वोत्तम गोलकिपरचा पुरस्कारही मिळाला होता. तसेच इंग्लंडकडे इयान सोलन आणि हॅरि मार्टीन सारखे हॉकीपटू आहेत.
इंग्लंडने 2010 आणि 2014 च्या विश्वचषकात चांगली कामगिरी केली होती. ते दोन्हीही विश्वचषकात चौथ्या क्रमांकावर होते. तसेच 1986 च्या विश्वचषकाचे उपविजेते होते. ही त्यांची विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरी आहे.
पण इंग्लंडला अव्वल क्रमांकावर असणाऱ्या आॅस्ट्रेलियाचे आव्हान असणार आहे हे विसरुन चालणार नाही. आॅस्ट्रेलियाने त्यांच्या या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात आयर्लंडला 2-1 असे पराभूत केले होते.
त्याचबरोबर त्यांना आयर्लंड संघाने चांगली लढत दिली होती. आयर्लंडने त्यांच्या विरुद्ध पाच पेनल्टी कॉर्नरही मिळवले होते. तसेच आॅस्ट्रेलियाला 16 शॉट्समध्ये फक्त दोन गोल करण्यात यश आले होते. त्यामुळे आॅस्ट्रेलियाला ही कामगिरी इंग्लंड विरुद्ध सुधारावी लागणार आहे.
त्यांचा कर्णधार एडी ओकेडेनने पेनल्टी कॉर्नरवर ब्लॅक गोव्हरसह आयर्लंड विरुद्ध पहिला गोल केला होता. त्यामुळे यावेळी त्यांच्याकडून चांगली कामगिरी आपेक्षित आहे. तसेच ऑस्ट्रेलियाला संघातील जॅमी डॉयर आणि मार्क नोल्स या अनुभवी खेळाडूंची संघाला उणीव भासेल.
आॅस्ट्रेलियाने मागील 2010 आणि 2014 असे दोन्ही विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले आहेत. तसेच त्यांनी यावर्षीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही भारताला अंतिम सामन्यात पराभूत करत विजेतेपद मिळवले होते.
आॅस्ट्रेलियाचा संघ यावर्षी चांगलाच लयीत आहे. त्यांनी यावर्षीच्या जवळजवळ सर्वच महत्त्वाच्या स्पर्धा जिंकल्या आहेत. यात राष्ट्रकुल स्पर्धा 2018, सुलतान अजलान शहा कप स्पर्धा यांचा समावेश आहे.
याआधी इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया संघ हॉकी वर्ल्ड लीग फायनलमध्ये शेवटचे आमने-सामने आले होते. हा सामनाही भुवनेश्वरमध्ये झाला होता. यात आॅस्ट्रेलियाने 4-1 अशा फरकाने विजय मिळवला होता.
तसेच आत्तापर्यंत हे दोन संघ 2013 पासून 11 वेळा आमने-सामने आले असून यात आॅस्ट्रेलियाने 7 तर इंग्लंडने 2 वेळा विजय मिळवला आहे. तसेच दोन सामने बरोबरीत सुटले आहेत.
तसेच आत्तापर्यंत विश्वचषकात हे दोन संघ 10 वेळा एकमेकांसमोर प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहिले आहेत. यातील 8 सामने आॅस्ट्रेलियाने आणि 2 सामने इंग्लंडने जिंकले आहेत. तसेच विश्वचषकात इंग्लंडला आॅस्ट्रेलिया विरुद्ध फक्त 8 गोल करण्यात यश आले आहे. तर आॅस्ट्रेलियाने इंग्लंड विरुद्ध तब्बल 23 गोल नोंदवले आहेत.
त्यामुळे आकडेवारी जरी आॅस्ट्रेलियाच्या बाजूने झुकते माप देत असली तरी इंग्लंडचा संघही कमाल करु शकतो. त्यामुळे आता इंग्लंडचा संघ गतविजेत्या आॅस्ट्रेलियाला कसा रोखतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
आज होणाऱ्या इंग्लंड विरुद्ध आॅस्ट्रेलिया सामन्याचे थेट प्रक्षेपण थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट नेटवर्क, दूरदर्शनवर आणि एफआयएचच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर होणार आहे.
असे आहेत संघ:
इंग्लंड: गिब्सन हॅरी(गोलकिपर), एम्स डेव्हिड, कॅलनन विल, बॅरी मिडलटन, जॉर्ज पिनेर(कर्णधार, गोलकीपर), इयान सोलन(कर्णधार), हॅरि मार्टीन, अॅडम डीक्सोन, गॉल जेम्स, ग्लेगोर्ने मार्क, रॉपर फिल (कर्णधार), सॅनफोर्ड लिआम, टेलर ल्यूक, वॉलेस जॅचरी, वॉलर जॅक, होर्न मायकल, कोंडोन डेव्हिड, अॅन्सेल लिआम.
ऑस्ट्रेलियाचा: ओकेडेन एडी (कर्णधार), क्रेग टॉम, वेयर कोरी, हार्वी जेक, विखम टॉम, डेवसन मॅट, बेल्टझ जोशुआ, व्हिटॉन जेक, गोवर्स ब्लेक, डोवार्ड टीम, झलोस्की अॅरन (कर्णधार), स्वान मॅथ्यू, ऑग्लीवी फ्लीन, बीली डॅनियल, लॉवेल टायलर (गोलकीपर), मिटन ट्रेंट, वॉदरस्पून डायलन, ब्रॅंड टीम, चार्टर अॅंड्यू (गोलकीपर), हेवर्ड जेरेमी.
महत्त्वाच्या बातम्या:
–हॉकी विश्वचषक २०१८: अर्जेंटिनाचा संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल
–हॉकी विश्वचषक २०१८: आघाडी घेतल्यावर फ्रान्सला स्पेन विरुद्ध मानावे लागले बरोबरीत समाधान
–ISL 2018: पेनल्टी, स्वयंगोलसह दिल्ली मुंबईकडून गारद