भुवनेश्वर। आज(5 डिसेंबर) 14 व्या हॉकी विश्वचषकात ड गटातील सामने रंगणार आहेत. यातील पहिल्या सामन्यात जर्मनीसमोर तीन वेळच्या विश्वविजेत्या नेदरलँड्सचे आव्हान असणार आहे. हा सामना संध्याकाळी 5 वाजता कलिंगा हॉकी स्टेडीयमवर सुरु होईल.
या दोन्ही संघानी या विश्वचषकातील त्यांचे पहिले सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघ त्यांचा सलग दुसरा विजय मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहेत.
नेदरलँडने त्यांच्या पहिल्या सामन्यात मलेशियाचा 7-0 अशा फरकाने पराभव केला होता. या सामन्यात त्यांनी मलेशियावर पूर्णपणे वर्चस्व ठेवले होते. या कामगिरीनंतर त्यांचा आत्मविश्वास दुणावला असेल.
जागतिक क्रमावारीत चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या नेदरलँड्सकडून मलेशिया विरुद्ध स्टार फॉरवर्ड जेरोइन हर्ट्झबेगरने गोलची हॅट्रीक केली होती. तसेच अनुभवी ड्रॅग फ्लिकर मिंक वॅन देर विडेन, प्रृईजर मिक्रो आणि ब्रिंकमन थिएरी यांनीही प्रत्येकी एक गोल केला होता. त्यामुळे जर्मनी विरुद्धही त्यांच्याकडून अशाच चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
तसेच नेदरलँडची कामगिरी मागील काही महिन्यात चांगली झाली आहे. त्यांनी यावर्षी जूलैमध्ये मायदेशात ब्रेडा येथे झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले होते.
त्याचबरोबर त्यांनी आत्तापर्यंत त्यांनी 1973, 1990 आणि 1998 असे तीन वेळी हॉकी विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले आहे. तसेच 2014 चा विश्वचषकाचे यजमानपदही भुषवताना त्यांनी रौप्य पदकाची कमाई केली आहे. त्यांना 2014 च्या हॉकी विश्वचषकात आॅस्ट्रेलिया विरुद्ध अंतिम सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता.
पण आज त्यांच्या समोर प्रतिस्पर्धी म्हणून उभा असणारा जर्मनीचा संघही नेदरलँडला कडवी लढत देऊ शकतो. जागतिक क्रमवारीत 6 व्या क्रमांकावर असणाऱ्या जर्मनीने विश्वचषक 2018 स्पर्धेतील त्यांच्या पहिल्या सामन्यात चार वेळच्या विजेत्या पाकिस्तानचा 1-0 असा पराभव केला होता.
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात जरी जर्मनीला एकच गोल करता आला असला तरी विजय मिळवल्याने त्यांना विश्वास मिळाला असेल. या सामन्यात जर्मनीकडून मिल्टकाऊ मार्कोने गोल करत हा विजय मिळवून दिला होता.
तसेच या सामन्यात टॉम ग्रॅंबुशनेही जर्मनीला गोल करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध करुन दिल्या होत्या. त्याला पाकिस्तान विरुद्ध सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला होता. त्यामुळे नेदरलँड्स विरुद्ध त्यांना अशीच कामगिरी करावी लागेल. याबरोबरच कर्णधार हॅनेर मार्टीन आणि हॉक टोबीयास यांचा अनुभव महत्त्वाचा ठरेल.
तसेच आत्तापर्यंत 1973 पासून विश्वचषकात जर्मनीचा संघ फक्त एकदाच पहिल्या चार संघामधून बाहेर राहिला आहे. तेही मागील 2014 ला झालेल्या विश्वचषकात त्यांना सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. तसेच त्याआधी 1971 च्या पहिल्या विश्वचषकात ते पाचव्या क्रमांकावर होते.
आमने – सामने-
नेदरलँड्स आणि जर्मनी या दोन संघात याआधी 2013 पासून 26 सामने झाले आहेत. यातील 10 सामन्यात जर्मनीने आणि 11 सामन्यात नेदरलँड्सने विजय मिळवला आहे. तसेच 5 सामने बरोबरीत सुटले आहेत.
विश्वचषकात हे दोन संघ आत्तापर्यंत 6 वेळा आमनेसामने आले आहेत त्यातील तीन सामने बरोबरीचे राहिले आहेत. तर दोन सामन्यात 2 सामन्यात जर्मनीने आणि 1 सामन्यात नेदरलँड्सने विजय मिळवला आहे.
त्यामुळे विश्वचषकातील नेदरलँड्स विरुद्धचे हे वर्चस्व कायम ठेवण्याचा जर्मनी प्रयत्न करेल. पण त्याचबरोबर आत्मविश्वासाने भरलेला नेदरलँड्सचा संघही जर्मनीला रोखण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल.
आज होणाऱ्या नेदरलँड्स विरुद्ध जर्मनी सामन्याचे थेट प्रक्षेपण थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट नेटवर्क, दूरदर्शनवर आणि एफआयएचच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर होणार आहे.
असे आहेत संघ:
जर्मनीचा संघ: हॅनेर मार्टीन (कर्णधार), म्युलर मॅथियस, ग्रॅंबुश मॅट्स, विंडफेडर लुकास, वेलेन निकलास, गुयेन डॅन, हरब्रुच टीम, हॉक टोबीयास, ग्रॅंबुश टॉम, लिंकोगेल डेटर, ऱ्हुर ख्रिस्तोफर, विंक फर्डिनांड, वॉल्टर टोबीयस (गोलकिपर), मिल्टकाऊ मार्को, फुच्स फ्लोरीयन, फुर्क बेनेडीक्ट, ग्रोब जोहान्सन, अॅली विक्टर (गोलकिपर)
नेदरलँड्सचा संघ: बार्ट सँडर, बेकर बिली (कर्णधार), बल्क लार्स, ब्लॅक पिरमिन(गोलकीपर), प्रृईजर मिक्रो, ब्रिंकमन थिएरी, जेरोइन हर्ट्झबेगर, क्रुन जोरीट, द गेउस जोनास, द वूग्द बॉब, द वँग सँडर, केम्परमन रॉबर्ट, शुरमन ग्लेन, वॅन एस सेव, वॅन दम थेज, वॅन देर वेन सॅम (गोलकीपर), वॅन देर विर्डेन मिंक, वेर्गा वॅलेंटाइन.
महत्त्वाच्या बातम्या:
–हॉकी विश्वचषक २०१८: इंग्लंडची पहिल्या विजयाची प्रतिक्षा कायम, बलाढ्य ऑस्ट्रेलियाने केली सहज मात
–२०११ विश्वचषकाचा हिरो गौतम गंभीरची क्रिकेटमधून निवृत्ती
–धोनी आणि धवनने ही गोष्ट करायलाच हवी, गावसकरांनी ठणकावले