भुवनेश्वर। 14व्या विश्वचषकात आज (8डिसेंबर) यजमान भारत विरुद्ध कॅनडा असा सामना कलिंगा स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्याला रात्री 7 वाजता सुरूवात होणार आहे.
भारतासाठी हा महत्त्वाचा सामना आहे. तो जिंकला तर भारतीय संघाचे उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित होणार आहे. या विश्वचषकात त्यांनी पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 5-0 असे पराभूत करत विजयी सुरूवात केली आहे. तर दुसऱ्या सामन्यात बेल्जियम विरुद्ध 2-2 असे बरोबरीवर समाधान मानावे लागले.
या दोन सामन्यात भारताकडून सिमरनजीत सिंगने तीन गोल केले आहे. त्याला आकाशदिप सिंग आणि हरमनप्रीत सिंग यांनी योग्य साथ दिली आहे. गोलकिपर पीआर श्रीजेशनेही या विश्वचषकात उत्तम कामगिरी केली आहे. मागील काही सामन्यांपासून त्याने त्याच्या शैलीत बऱ्याच सुधारणा केल्या आहेत.
तसेच कॅनडाला पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे. त्यांना पहिल्याच सामन्यात बेल्जियमकडून 2-1 असे पराभूत व्हावे लागले. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 1-1 असे समाधान मानावे लागले. त्यांनी जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या बेल्जियमविरुद्ध चांगला संघर्ष केला होता. गोलकिपर कार्टर डेव्हिडनेही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अनेक हल्ले अडवत त्यांना सामना जिंकण्यापासून रोखले होते.
कॅनडाकडून कर्णधार टपर स्कॉट आणि पियर्सन मार्क या दोघांनाच गोल करता आले आहे.
आज हे दोन देश पाचव्यांदा एकमेंका विरुद्ध विश्वचषकात खेळणार आहेत. याआधीच्या चार सामन्यांमध्ये प्रत्येकी 2 विजय दोन्ही संघाच्या नावावर आहेत. तसेच 2013पासून या दोन संघामध्ये पाच सामने झाले आहेत. यामध्ये भारत तीन सामन्यांमध्ये विजय मिळवत आघाडीवर आहे. तर कॅनडाने एक सामना जिंकला असून एक सामना अनिर्णीत राहिला आहे. या पाच सामन्यांमध्ये भारताने पंधरा गोल केले आहेत.
त्याचबरोबर जागतिक क्रमवारीत 11 व्या स्थानी असणाऱ्या कॅनडाचा आत्मविश्वास बेल्जियमला दिलेल्या कडव्या प्रतिकारानंतर आणि दक्षिण आफ्रिकेला बरोबरीत रोखल्यापासून वाढला असेल.
दुसरा विश्वचषक जिंकण्याच्या इराद्याने उतरलेल्या भारतीय संघानेही या स्पर्धेत उत्तम कामगिरी केली आहे. याआधी भारताने 1975ला विश्वचषक जिंकला आहे. सध्या ते जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहेत.
भारत हा सामना जिंकल्यावर उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित करू शकतो. यामुळे या सामन्यात भारत कशी कामगिरी करणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
आज होणाऱ्या भारत विरुद्ध कॅनडा सामन्याचे थेट प्रक्षेपण थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट नेटवर्क, दूरदर्शनवर आणि एफआयएचच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर होणार आहे.
असे आहेत संघ,
भारत: मनप्रीत सिंग (कर्णधार), चिंग्लेसना सिंग कंगुजाम, कृष्णा बहादूर पाठक (गोलकिपर), हरमनप्रीत सिंग, बिरेंद्र लाक्रा, वरूण कुमार, कोथाजीत सिंग खंडागबम, सुरेंदर कुमार, अमित रोहिदास, निलकांता शर्मा, हार्दीक सिंग, सुमित, आकाशदिप सिंग, मनदिप सिंग, दिलप्रीत सिंग, ललित कुमार उपाध्याय, सिमरनजीत सिंग, पीआर श्रीजेश (गोलकिपर),
कॅनडा- कार्टर डेव्हिड(गोलकीपर), बिसेट ब्रेंडन, हिल्डरेथ रिचर्ड, हो-गार्सीया गेब्रियल, जोन्सटन गोर्डन, किंडलर अँटोनी(गोलकीपर), किर्कपॅटिक जेम्स, पानेसर बलराज, पानेसर सुखी, पियर्सन मार्क, परेरा ब्रेंडन, परेरा किगन, सारमेंटो मॅथ्यू, स्कोलफिल्ड ऑलिव्हर, स्मिथ लेन, स्मिथ जॉन, टपर स्कॉट(कर्णधार), वाॅलेस जेम्स, वॅन सन फ्लोरीस
महत्त्वाच्या बातम्या:
–आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: तिसऱ्या दिवसाखेर भारताकडे १६६ धावांची आघाडी
–होय! कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात गंभीरची चमकदार कामगिरी
–हॉकी विश्वचषक २०१८: इंग्लंड विरुद्धच्या पराभवाने आयर्लंड स्पर्धेतून बाहेर
–हॉकी विश्वचषक २०१८: ऑस्ट्रेलियाचा चीन विरुद्ध एकतर्फी विजय