भुवनेश्वर। कलिंगा हॉकी स्टेडीयम, भुवनेश्वर, ओडिशा येथे सुरु असलेल्या 14 व्या हॉकी विश्वचषकात आज (5 डिसेंबर) मलेशिया विरुद्ध पाकिस्तान असा सामना होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरूवात होणार आहे.
दोन्ही संघांनी या विश्वचषकातील त्यांचे पहिले सामने गमावले आहेत. यामुळे आजच्या सामन्यात त्यांना विजय आवश्यक आहे. मलेशियाला नेदरलॅंड्सकडून 0-7 अश्या मोठ्या फरकाने पराभव स्विकारावा लागला. तर पाकिस्तानलाही जर्मनीकडून 0-1 असे पराभूत व्हावे लागले.
आधीच्या विश्वचषकातील या दोन्ही संघाच्या एकमेंकाविरोधातील सामने बघता 5 पैकी 5 सामन्यात पाकिस्तान विजयी ठरला आहे. तसेच 2013पासून या संघांमध्ये 21 सामने झाले आहेत. यामध्ये 9 विजय पाकिस्तानच्या आणि 8 विजय मलेशियाच्या नावावर असून 4 सामने अनिर्णीत राहिले आहेत.
पाकिस्तानला जरी पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले तरी त्यांचा खेळ उत्तम होता. त्यांनी जागतिक क्रमवारीत 6व्या स्थानावर असणाऱ्या जर्मनीला गोल करण्यापासून 36 मिनिटे रोखून धरले होते. तसेच त्यांचा गोलकिपर इम्रान बटनेही महत्त्वाची भुमिका बजावत जर्मनीला अधिक गोल करण्यापासून रोखले होते.
या विश्वचषकातील पहिल्या सामन्यात मलेशियाची कामगिरी मात्र खुपच ढिसाळ झाली. नेदरलॅंड्सच्या खेळाडूंना रोखण्यात त्यांना पहिल्या सत्रापासूनच अपयश येत होते. यामुळे आजच्या सामन्यात त्यांना त्यांचा खेळ उंचावण्याची गरज आहे.
तसेच या दोन्ही संघाची एकमेकाविरुद्धची कामगिरी बघता सर्वाधिक गोल पाकिस्तानच्या खेळाडूंनी केले आहेत. तर सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात दोन्ही संघाने एकही गोल केला नसून कोण पहिला गोल करणार हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.
आज होणाऱ्या मलेशिया विरुद्ध पाकिस्तान सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट नेटवर्क, दूरदर्शनवर आणि एफआयएचच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर होणार आहे.
असे आहेत संघ:
पाकिस्तानचा: रिझवान मुहम्मद (कर्णधार), बट इम्रान (गोलकिपर), अली मुबाशर, अर्शद तोसिक, मेदमूद रशीद, इरफान जुनीयर मुहम्मद, इरफान मुहम्मद, शान अली, अब्बास मझहर (गोलकिपर), बिलाल अलीम, भुट्टा उमर, बट अम्माद, झुबेर मुहम्मद, अतीक मुहम्मद, कादीर मुदम्मद फैसल,अब्बास तासावर, अहमद अजाझ, मेहमूद अबु
मलेशिया: अशारी फरहान, कोलन सईद, हसन अझुआन, ताजुद्दीन तेंग्कू, निक रोझेमी, फेझल सारी, फित्री सारी, जाली फेज, मुतालीब सुक्री (कर्णधार), एमन रोझमी, नाबीस नुर, रहिम रझीए, रेहमान हैरी (गोलकीपर), रोजली रामदान, सुब्रमिनियम कुमार(गोलकीपर), सुमंतरी नॉर्सीयाफिक, वॅन ह्युझन जोएल, जलील मेरहान.
महत्त्वाच्या बातम्या-
–ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये अँडी मरे, सेरेना विल्यम्स करणार पुनरागमन
–पहिल्या कसोटीत आॅस्ट्रेलियाने उपकर्णधारालाच दिला डच्चू
–सुनील गावसकर, कपिल देव निवडणार भारतीय महिला संघाचा नवीन प्रशिक्षक?