---Advertisement---

आनंदाची बातमी! दीर्घ काळानंतर महाराष्ट्रातील हॉकीपटूंनी सुरु केला सराव

On: शुक्रवार, ऑक्टोबर 30, 2020 8:00 PM
---Advertisement---

मुंबई | भारतीय गृह मंत्रालयाच्या (एमएचए) मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्रातील हॉकी खेळाडूंनी सराव सुरु केला आहे. हॉकी इंडियाने दिलेल्या सविस्तर एसओपी आणि मार्गदर्शक तत्त्वे लक्षात घेऊन हा सराव सुरू करण्यात आला आहे. खेळाडू लवकरात लवकर फॉर्ममध्ये येतील अशी आशा महाराष्ट्र हॉकीचे सरचिटणीस मनोज भोरे यांनी व्यक्त केली आहे.

नियमांचे करत आहेत पालन 

महाराष्ट्र राज्यात 150 खेळाडूंनी सरावाला पुन्हा सुरुवात केली आहे. कोरोना या साथीच्या आजारामुळे बरेच महिने ते मैदानापासून दूर होते.17 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या हॉकीपटूंनी सराव सुरु केला आहे. प्रशिक्षक आणि खेळाडू, देशांतर्गत स्पर्धा आणि जिल्हास्तरीय लीग सामन्यांची तयारी करत आहेत. ते हॉकी इंडियाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करत आहेत.

याआधी हॉकीपटूंनी सुरु केला होता सराव 

याआधी हॉकीपटूंनी 19 ऑगस्ट 2020 रोजी बेंगलोर येथील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया कॅम्पसमध्ये सराव सुरु केला होता. हॉकी इंडियाने दिलेल्या नियमांचे पालन कसे करावे याविषयी खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षकांनी याआधी आपला अनुभव सांगितला होता.

हॉकी इंडियाचे आभारी आहोत – मनोज भोरे 

“आमचे खेळाडू बर्‍याच दिवसांपासून मैदानापासून दूर होते. त्यांना परत मैदानावर बघून आनंद झाला. आमच्या खेळाडूंना लवकरात लवकर मैदानात येण्याची परवानगी दिल्याबद्दल आम्ही हॉकी इंडियाचे आभारी आहोत. सर्व खेळाडू आणि अधिकारी मार्गदर्शक तत्त्वांचे योग्य प्रकारे पालन करीत आहेत का हे आम्ही सुनिश्चित करत आहोत. आम्हाला आशा आहे की खेळाडू लवकरात लवकर आपल्या फॉर्ममध्ये परत येतील.” असे हॉकी महाराष्ट्रचे सरचिटणीस श्री मनोज भोरे यांनी सांगितले.

पायाभूत सुविधा सुधारण्यावर दिला भर 

महाराष्ट्रातील क्रीडा उपक्रम पुन्हा सुरू केल्याबद्दल बोलताना महाराष्ट्रचे हॉकी अध्यक्ष हितेश जैन म्हणाले की, “खेळाडूंनी त्यांच्या खेळाशी संलग्न असणे फार महत्वाचे आहे. आम्हाला आमच्या राज्यात हळू हळू क्रीडा उपक्रम सुरू करण्याची संधी मिळाल्यामुळे आनंद झाला. जेव्हा खेळाडू मैदानापासून दूर होते तेव्हा आम्ही गेल्या काही महिन्यांत पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर देत होतो. जुलै महिन्यात आयकॉनिक बालेवाडी स्टेडियमवर पूर्ण आकाराच्या हॉकी टर्फच्या जागेच्या पुनर्वसनाच काम पूर्ण केले. त्यामुळे महाराष्ट्रातील हॉकीपटूंना मोठ्या प्रमाणात मदत होईल. आम्ही आशा करतो की या संधीचा उपयोग खेळाडूं आपला खेळाचा अधिक विकास करण्यासाठी करतील.”

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---