वेस्ट इंडीजचे दिग्गज माजी वेगवान गोलंदाज मायकल होल्डिंग यांनी जागतिक कसोटी चॅम्पियनशीपमध्ये गुण देण्याच्या पद्धतीला मूर्खपणा म्हटले आहे. ते म्हणाले की, जेव्हा संघांना वाटेल की ते गुणतालिकेमध्ये पहिल्या २ क्रमांंकावर स्थान मिळवू शकणार नाहीत, तेव्हा काही कसोटी सामने केवळ औपचारिक होऊन जातील.
चॅम्पियशीपमध्ये होणाऱ्या प्रत्येक मालिकेसाठी एकूण 120 गुण असतील. म्हणजेच जर दोन सामन्यांची मालिका असेल तर या मालिकेतील एक सामना जिंकणाऱ्या संघाला 60 गुण मिळतील.
पण सामना जर अनिर्णित राहिला तर दोन्ही संघाला प्रत्येकी 20 गुण आणि जर बरोबरी झाली तर दोन्ही संघाला प्रत्येकी 30 गुण दिले जातील. पराभूत होणाऱ्या संघाला एकही गुण मिळणार नाही
जर मालिका 3 सामन्यांची झाली तर एका सामन्यात जिंकणारा संघ 40 गुण मिळवेल. तर अनिर्णित झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी 13 गुण आणि बरोबरी झाली तर दोन्ही संघांना प्रत्येकी 20 गुण दिले जातील.
अशाप्रकारे मालिकेतील सामन्यांची संख्या कितीही असो, परंतु अधिकतर कोणताही संघ केवळ १२० गुणच मिळवू शकतो. गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहणाऱ्या २ संघांना अंतिम सामन्यात स्थान मिळवता येईल.
कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना जून २०२१ मध्ये लॉर्ड्स येथे खेळण्यात येणार आहे. द्विपक्षीय क्रिकेट सामन्यात वाढ होण्यासाठी आयसीसीने मागील वर्षी जागतिक कसोटी चॅम्पियनशीप सुरु केली होती.
विस्डेन क्रिकेट मंथ्लीबरोबर राऊंड टेबल चर्चेदरम्यान होल्डिंग (Michael Holding) म्हणाले की, “हे काम करणार नाही. सर्वप्रथम तर ती गुण देण्याची पद्धत म्हणजे मूर्खपणा आहे. ५ कसोटी सामने खेळूनही तुम्हाला तेवढे गुण मिळणार नाहीत, जेवढे २ कसोटी सामने खेळून मिळतात.”
“तसेच दुसरी गोष्ट म्हणजे, एका टप्प्यानंतर संघांना कळेल की ते अंतिम सामन्यात प्रवेश करणार नाहीत. त्यामुळे उर्वरित सामने पाहण्यात काही मजा येणार नाही. लोकांना माहित असणार की, हा केवळ दुसरा एखादा सामना आहे,” असेही होल्डिंग पुढे म्हणाले.
या चर्चेत सहभागी असणारा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स (Chris Woaks) म्हणाला की, “भविष्यात गुणतालिकेत बदल केला जाऊ शकतो. न्यूझीलंडविरुद्धची मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशीपचा (World Test Championship) भाग नव्हती. परंतु खेळाडू म्हणून या पराभवाचा आमच्यावर मोठा परिणाम झाला होता.”
“मला असे वाटते की, भविष्यात गुणतालिकेत थोडा बदल करण्याची गरज आहे. अंतिम सामन्यात नाणेफेक आणि परिस्थितीच्या आधारावर कोणताही संघ कोणालाही पराभूत करू शकतो. जर वेळापत्रकामध्ये अधिक वेळ मिळाला तर ३ सामन्यांची अंतिम मालिका होऊ शकते. परंतु दुर्दैवाने असे होणार नाही,” असेही वोक्स पुढे म्हणाला.
याव्यतिरिक्त आयसीसीने शुक्रवारी (१मे) जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत भारतीय संघाला अव्वल स्थान गमवावे लागले. भारतीय संघाची पहिल्या स्थानावरुन थेट तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. ताज्या कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलिया संघ अव्वल तर न्यूझीलंड संघ दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाचे कसोटीत ११६, न्यूझीलंडचे ११५ तर भारताचे ११४ गुण आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
–क्रिकेट इतिहासात सर्वात वेगवान चेंडू टाकणारे ३ गोलंदाज
-पदार्पणाच्या कसोटी मालिकेतच मॅन ऑफ द सिरीज ठरलेले ३ भारतीय खेळाडू, एक आहे २० वर्षांचा






