मुंबई । महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्या सत्राला टाटा समूहाचे प्रायोजकत्व मिळणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत केली. नव्या मौसमाच्या प्रारंभिच होणारी एटीपी वर्ल्ड टूर मालिकेतील ही पहिलीच स्पर्धा असून पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात 1 ते 6 जानेवारी 2018 दरम्यान पार पडणार आहे. या स्पर्धेची पात्रता फेरी 30 व 31 डिसेंबर 2017 रोजी होणार असून मुख्य फेरी 1 जानेवारी 2018 पासून होणार आहे.
यावेळी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, या स्पर्धेची घोषणा करतानाच टाटा समूहाचा सहभाग जाहीर करताना मला अधिक आनंद व अभिमान वाटत आहे. टाटा समूहाने क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी नेहमीच बहुमोल योगदान दिले आहे आणि या स्पर्धेला त्यांचा पाठिंबा हि आमच्यासाठी अधिक अभिमानाची बाब आहे. तसेच, सहप्रायोजक म्हणून संयोजन समितीत सहभाग घेण्यास आणि त्यांच्या क्लीन सिटी मोहिमेचा प्रचार करण्यासाठी या स्पर्धेचा उपयोग करण्यास संमती दिल्याबद्दल मी अदर पूनावाला यांचे खास आभार मानतो.
यावेळी टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेच्या अधिकृत लोगोचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी संयोजन समिती अध्यक्ष प्रवीण सिंग परदेशी(आयएएस), टाटा संन्सच्या पायाभूत सुविधा व एरोस्पेस विभागाचे अध्यक्ष बनमाळी अग्रवाला, संयोजन सचिव प्रवीण दराडे, स्पर्धा संचालक प्रशांत सुतार, संजय खंधारे आणि एमएसएलटीचे मानद सचिव सुंदर अय्यर आदी मान्यवर उपस्थित होते.
The moment we all have been waiting for!
The Chief Minister of Maharashtra, @Dev_Fadnavis announcing the Title Sponsor and unveiling the tournament logo.#MaharashtraOpen pic.twitter.com/yFCipugS9u
— Tata Open Maharashtra (@MaharashtraOpen) December 6, 2017
महाराष्ट्र हे वेगाने देशातील क्रीडा क्षेत्राचे मुख्य केंद्र बनत चालल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, याआधी महाराष्ट्राने डेव्हिस कप (पुणे), एटीपी चॅलेंजर(पुणे), डब्लूटीए मुंबई ओपन, या स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले आहे. खेळ हा प्रत्येक नागरिकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असला पाहिजे आणि अशाच स्पर्धांमुळे त्यांना यासाठी प्रेरणा मिळणार आहे.
या स्पर्धेच्या सहभागाविषयी बोलताना टाटा संन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन म्हणाले कि, टाटा समूहाने नेहमीच क्रीडा क्षेत्राचा विकास व प्रासाराठी प्रयत्न केले आहेत. तसेच, तंदरुस्त, निरोगी समाजासाठी क्रीडा क्षेत्र महत्वाची भूमिका बजावत असल्यावर आमचा विश्वास आहे. देशभरातील विविध क्रीडा प्रकार आणि क्रीडा पटूंच्या विकासासाठी टाटा समूहाने गेल्या शतकापेक्षा अधिक काळ महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळेच आता राज्य शासन आणि एमएसएलटीए यांच्या सहयोगातून टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेला प्रायोजित करताना आम्हांला अत्यंत आनंद होत आहे. या स्पर्धेमुळे नवनव्या हजारो प्रेक्षकांपर्यंत टेनिसमधील गुणवत्ता पोहोचेल आणि टेनिसची लोकप्रियता अधिकाधिक वाढेल, असा आमचा विश्वास आहे.
या स्पर्धेला प्रायोजित केल्याबद्दल टाटा समूह व सर्व प्रायोजकांचे मी आभार मानतो असे सांगून संयोजन समिती अध्यक्ष प्रवीण सिंग परदेशी म्हणाले कि, अशा प्रतिष्ठित स्पर्धेसाठी समविचारी व क्रीडा क्षेत्रावर प्रेम करणारी मंडळी एकत्र आल्यामुळे हि स्पर्धा अभूतपूर्व यशस्वी होईल आणि महाराष्ट्राला जागतिक नकाशावर पोहोचवेल, असा माझा विश्वास आहे.
CM @Dev_Fadnavis launches logo of Tata Open Maharashtra ATP world tour 250 series in Mumbai.
This tennis tournament is scheduled to be played in Pune from 1st to 6th January 2018.
For last 21 years, this tournament was played in Chennai !@MaharashtraOpen #Tennis #ATP250 pic.twitter.com/UCLK0Bg75Q— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 6, 2017
महाराष्ट्राला टेनिस हब बनविण्याचे आमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी टाटा समूहाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून प्रवीण दराडे म्हणाले कि, अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करून देशभरातील खास करून महाराष्ट्रातील टेनिस चाहत्यांपर्यत अधिकाधिक हा खेळ पोहोचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
प्रथम 1996 मध्ये सुरु झालेल्या या स्पर्धेत राफेल नदाल, स्टॅनिस्लास वावरिंका, कार्लोस मोया, पॅट्रिक राफ्टर, मिलोस रावनीच, मेरीन सीलीच अशा दर्जदार खेळाडूंनी यापूर्वी भाग घेतला आहे. महाराष्ट्रात पदार्पणात प्रथमच पुण्यात होणारी हि स्पर्धा महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए), क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र सरकार यांनी आयोजित केले असून त्यांना आयएमजी रिलायन्स यांचा पुरस्कार मिळाला आहे.
स्पर्धा संचालक प्रशांत सुतार म्हणाले कि, टाटा आणि अदर पुनावाला क्लीन सिटी हे पुरस्कर्ते या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेला लाभले आहेत हि खरंच आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. टाटा आणि अदर पुनावाला क्लीन सिटी, अन्य पुरस्कर्त्यांमुळे आम्हांला हि स्पर्धा संस्मरणीय व यशस्वी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
टाटा समूहासारख्या जागतिक ब्रँडशी सहयोग झाल्यामुळे स्पर्धेची प्रतिष्ठा उंचावली असून या स्पर्धेत गुंतवणूक करणाऱ्या सर्वांना हि स्पर्धा सर्वोत्तम पद्धतीने पार पडण्याची ग्वाही मिळाली आहे. पुण्यातील पदार्पणातच टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत जगातील काही दर्जदार खेळाडू सहभागी होणार असून त्यामुळे आमच्या चाहत्यावर्गात प्रचंड भर पडणार असल्याचे स्पर्धेचे सहसंचालक टॉम अन्युअर यांनी सांगितले
आयोजन समितीचे कोषाध्यक्ष संजय खंदारे म्हणाले की, आम्हाला घोषणा करताना आनंद होतो की, स्पर्धेत 550,000 युएस डॉलर रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला 80,000 युएस डॉलर रकमेचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत जागतिक मानांकन यादीतील अव्वल 50 खेळाडूंमधील सहाव्या क्रमांकाचा मेरीन सिलिच (क्रोशिया), जागतिक क्र. 14 खेळाडू केविन अँड्रेसेन(दक्षिण अफ्रिका), जागतिक क्र.20 रॉबेर्टो बॉटिस्टा ऑगट(स्पेन) आणि जागतिक क्र. 42 रॉबिन ह्यासे यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी टेनिसप्रेमींना मिळणार आहे.