आपल्या कबड्डी खेळाला सोन्याचे दिवस आले आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कबड्डीला नवीन ओळख मिळवून देणाऱ्या प्रो कबड्डीची थोडक्यात सुरुवात बघू.
कबड्डी खेळाला अनेक वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. आपल्या लहानपणी बहुतेक जण कबड्डी हा खेळ खेळलेले आहेत. भारतात कबड्डीच्या हजारों संघांची नोंद आहे, तसेच शालेयस्तरावर अनेक संघ आहेत. तरी सुध्दा कबड्डीला तेवढ महत्त्व प्राप्त का झालं नाही ? परंतु २०१४ ला सुरू झालेल्या प्रो कबड्डी लीगने कबड्डीला एक नवीन ओळख निर्माण करून दिली आहे.
भारतात एखाद्या क्रिकेटपटूला जेवढे लोक ओळखतात तेवढे कोणत्याही कबड्डीपटूला ओळखत नव्हते पण प्रो कबड्डीने खेळाबरोबर खेळाडूंना पण एक नवीन ओळख मिळवून दिली. आयपीएल प्रमाणे कबड्डी खेळाची लीग खेळण्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा उदयोग समूहाने पुढाकार घेतला आणि प्रो कबड्डीची सुरुवात झाली.
आज कबड्डी हा खेळ देशात आणि परदेशात अतिशय लोकप्रिय आहे. कबड्डी खेळाला नवीन ओळख मिळूवून देण्यामध्ये आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकार म्हणून नाव निर्माण करुन देण्यामध्ये प्रो कबड्डीचं खूप मोठं योगदान आहे. प्रो कबड्डी लीग खेळण्यासाठी देशातील मोठ्या शहराची निवड करण्यात आली. सामने खेळण्यासाठी इनडोअर स्टेडियम विकसित करण्यात आली. वेगवेगळ्या खाजगी कंपन्यांनी लीगसाठी स्पॉन्सरशीप दिली. क्रिकेट प्रमाणेच आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग प्रो कबड्डी लीगमध्ये करण्यात आला.
जागतिक पातळीवर या खेळाचा विचार केल्यास आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाची ३२ देशांना मान्यता आहे. याआधी कधीही कबड्डी सामने टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपण दाखवलं जात नव्हते पण प्रो कबड्डीच्या सर्व सामन्यांचं स्टार स्पोर्ट्स वाहिनीवरून प्रक्षेपण दाखवू लागल्यामुळे कबड्डीचा प्रेक्षकवर्ग वाढला. सुरुवातीला मशाल स्पोर्ट्स कंपनीच्या उपक्रमाचे स्टार स्पोर्ट्सकडे प्रक्षेपणाचे अधिकार होते. मात्र लीगच्या पहिल्या हंगामानंतर त्यांनी मशाल स्पोर्ट्समध्ये गुंतवणूक करीत थेट लीगचे अधिकार मिळवले. प्रो कबड्डी लीगकडे स्टार स्पोर्ट्सने एक व्यावसायिक रूप म्हणून बघितलं, व्यवसायिक असल्याने नफा कमावणं हा त्यांचा उद्देश होता. यात चुकीचं काहीच नाही.
प्रो कबड्डी हंगाम एकची सुरुवात जुलै २०१४ मध्ये झाली. आयपीएल प्रमाणेच मोठ्या शहराची कबड्डीच्या संघ म्हणून निवड गेली यू-मुंबा, जयपुर पिंक पँथर, पुणेरी पलटण, पटणा पायरेटस्, बेंगाल वॉरियर्स, दबंग दिल्ली, तेलुगू टायटन्स, बंगळुरू बुल्स असे ८ संघ केले गेले. प्रत्येक संघाच्या शहरात ४ दिवस सामने खेळवले गेले. प्रत्येक शहरातील ७ सामन्यांपैकी ४ सामने यजमान संघाचे झाले.
उद्योग क्षेत्रातील वेगवेगळ्या व्यक्ती आणि खाजगी कंपन्यानी हे संघ विकत घेतले. देशातील आणि परदेशातील मिळून एकूण १०० कबड्डीपटूंनी प्रो कबड्डीच्या लिलावात सहभाग घेतला होता. सर्व फ़्रेन्चाइज़ना संघ खरेदीसाठी मर्यादित रक्कम ठेवली होती. प्रो कबड्डी लीगच्या सामन्याचा कार्यक्रम आयपीएल प्रमाणे आठ संघामध्ये लीग खेळवली गेली, पण बादफेरीनंतर थेट उपांत्यफेरी खेळवली गेली. अश्याप्रकारे प्रो कबड्डी लीगच्या सुरुवातीमुळे आपल्या कबड्डी खेळाला एक नवीन दिशा मिळाली.
-अनिल विठ्ठल भोईर
(लेखक कब्बडी अभ्यासक असून कबड्डी पंच म्हणून देखील काम पाहतात)