जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलमध्ये दोन नवे संघ आता १५ व्या हंगामात खेळताना दिसत आहेत. ऑगस्ट २०२१ ला टेंडर काढले गेले आणि ऑक्टोबर २०२१ मध्ये दोन फ्रॅंचाईजींचा लिलाव झाला. कोलकात्याचे बिझनेस टायकून संजिव गोयंका यांनी तब्बल ७०९० कोटींना लखनऊ, तर युकेची कॅपिटल व्हेंचर फर्म सीव्हीसी कॅपिटल्सने ५६०० कोटींना अहमदाबाद फ्रॅंचाईजी आपल्या नावे केली. संघांच्या किमतीचे हे आकडे पाहून अनेकांचे डोळे विस्फारले होते.
अनेकांना अनेक प्रश्न पडले असतील, एवढी इन्व्हेस्टमेंट केली खरी, पण यातून एवढा रिटर्न मिळणार का? एवढं करून फायदा होईल का? आता एवढे गुंतवलेतच तर, यातून कमाई कशाप्रकारे होते? याच साऱ्या प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत.
आयपीएल ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे. हे आता सर्वांनाच माहितीये. संघमालक एवढे हजारो कोटी गुंतवतात. त्याच्या बदल्यात त्यांना दरवर्षी किती फायदा होतो आणि आयपीएलचे हे बिझनेस मॉडेल कसे आहे? याचा जरा खोलात जाऊन विचार करूया.
मुंबई इंडियन्सला समोर ठेवून आपण हे सारे अर्थकारण समजून घेऊ. २००८ मध्ये ज्यावेळी फ्रॅंचाईजींवर बोली लागली तेव्हा सर्वात महाग फ्रॅंचाईजी होती मुंबईची. मुकेश अंबानी यांनी ५० मिलियन अमेरिकन डॉलर्सच्या बेस्ट प्राइजवरून सुरू झालेली. मुंबई फ्रॅंचाईजीची बोली १११.९ मिलियन अमेरिकन डॉलर्सला जिंकली.
आता इथून मुंबईची कमाई कशी झाली याला सुरुवात करूया. मुंबई आणि इतर आयपीएल संघांना सर्वात जास्त पैसे कुठून मिळतात तर ते म्हणजे ब्रॉडकास्टिंग कंपनीकडून. २००८ ला सोनी ग्रुपने ८२०० कोटी रुपयांना आयपीएल टीव्हीवर दाखवण्याचे हक्क दहा वर्षांसाठी विकत घेतले. ते सोनी म्हणजे सेट मॅक्स. त्यावेळी बीसीसीआय त्या पैशांपैकी २० टक्के रक्कम आपल्याकडे ठेवत आणि ८० टक्के रक्कम ही संघ वाटून घेत. याचाच अर्थ त्यावेळी संघांना प्रत्येकी ८२० कोटी रुपये एकट्या ब्रॉडकास्टिंग राइट्समधून मिळाले होते.
२०१७ मध्ये ब्रॉडकास्टिंग राईट्ससाठी पुन्हा लिलाव झाला आणि यावेळी स्टार स्पोर्ट्सने बाजी मारली. १६ हजार ३४७ कोटी रुपयांना त्यांनी ब्रॉडकास्टिंग राइट्स विकत घेतले आणि तेही फक्त पाच वर्षासाठी. यावेळी बीसीसीआयने पहिले ८०:२० असणारी वाटणी थेट ५०:५० आणली. असे करूनही फ्रॅंचाईजी नाराज झाल्या नाहीत. कारण, पैसा कमी झाला नाही. आता ते ब्रॉडकास्टर्स पैसे कमावतात ते मॅच सुरू असताना दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातीतून. एका १० सेकंदाच्या जाहिरातीचे १०-१२ लाख. सुरुवातीला साधारण वाटणारा हा आकडानंतर ब्रॉडकास्टर्सला ४५ दिवसांच्या आयपीएलनंतर फायदाच पोहोचवून जातो.
फ्रॅंचाईजींचा दुसरा इन्कम सोर्स म्हणजे टायटल स्पॉन्सर. आजही आयपीएल म्हटलं की अनेक जण बोलताना सहज म्हणतात ‘डीएलएफ आयपीएल’. पहिल्या पाच सीझनसाठी डिएलएफने २०० कोटी दिलेले. पुढच्या तीन वर्षासाठी पेप्सीने ‘पेप्सी आयपीएल’ म्हणण्यासाठी ३९६ कोटी खर्च केले. चायनीज मोबाईल कंपनी विवोने आपले नाव आयपीएल पुढे जोडण्यासाठी. २०१८-२०२२ या पाच वर्षाकरिता तब्बल २१९९ कोटी ओतलेले. आता टाटाही दर वर्षासाठी ३०० कोटी देणार आहेत. याची वाटणी ६० टक्के बीसीसीआय आणि ४० फ्रॅंचाईजी यांच्यात होते.
या टायटल स्पॉन्सरव्यतिरिक्त इतरही ब्रँड आयपीएलशी जोडले गेलेले असतात. स्ट्रॅटेजिक टाईम आउट. कमाल कॅच. मॅक्सीमम सिक्सेस. या सर्व गोष्टींसाठी मोठ्या रकमांचे करार अनेक स्पॉन्सर करतात. त्या रकमेचे देखील ६०:४० अशाच हिशोबाने वाटप केले जाते.
त्यानंतर येतात टीम स्पॉन्सर. आयपीएलसाठी काही दिवस शिल्लक असताना संघ आपल्या जर्सी लॉन्च करतात. त्या रंगीबेरंगी जर्सींना आणखी आकर्षक बनवण्याचे काम करतात स्पॉन्सर्स. जितका मोठा ब्रँड म्हणजे जितका प्रसिद्ध संघ तितकी स्पॉन्सरची अधिक किंमत. इथे देखील मुंबईचे उदाहरण द्यायचे झाल्यास भारतातील अव्वल फिनटेक ब्रॅंड असलेल्या स्लाईसने मुंबई इंडियन्सच्या जर्सीवर स्लाईसचा लोगो लावण्यासाठी तीन वर्षाकरिता तब्बल १०० कोटींचा करार केलाय.
आता मुंबई आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे, म्हणून त्यांना इतका मोठा करार भेटला. त्याचवेळी पंजाब किंग्स ही अपयशाचा शिक्का मारलेला संघ टायटल स्पॉन्सरकडून प्रतिवर्षी १० ते ११ कोटी घेतो. तरीही प्रत्येक फ्रॅंचाईजी दरवर्षी टीम स्पॉन्सर्समधून कमीत कमी ३०-३५ कोटींची कमाई करतात.
रिपोर्टनुसार, सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्स सर्वाधिक ब्रॅण्ड व्हॅल्यू असलेला आयपीएल संघ आहे. ते वर्षाला ७९१ कोटी रुपये कमावतात. संघाकडे आजच्या घडीला लहान-मोठे असे २२ स्पॉन्सर आहेत. दुसरीकडे सर्वात कमी ब्रँड व्हॅल्यू राजस्थान रॉयल्स संघाची असलेली दिसते. त्यांचे वार्षिक उत्पन्न २४९ कोटी इतके आहे, तर, १३ स्पॉन्सर्ससोबत त्यांचा सध्या करार आहे. याव्यतिरिक्त संघाचे अधिकृत मर्चंडाईज म्हणजेच टी-शर्ट, कॅप, मग इतर वस्तूंच्या विक्रीतूनही फ्रॅंचाईजी कमी-अधिक प्रमाणात पैसे कमावत असते.
आता आयपीएल केवळ मुंबई आणि पुण्यात होतेय. मागच्या दोन सिझनमध्ये तर प्रेक्षकांना स्टेडियमवर येण्यास मनाई होती. पण हे प्रेक्षकदेखील आयपीएल फ्रॅंचाईजींना भारी मोबदला मिळवून देतात. ज्या संघाच्या होम ग्राऊंडवर मॅच असेल. त्या मॅचच्या तिकीटविक्रीतून झालेला फायदा फ्रॅंचाईजीला होतो. सरासरी एका मॅच वेळी ५ कोटींची तिकिटे विकली जातात. त्यातील ८० टक्के फ्रॅंचाईजीचे अणि २० टक्के संबंधित राज्य क्रिकेट असोसिएशनचे.
याचबरोबर टीम ओनर्स जाहिरातीतूनही बक्कळ पैसा कमावतात. आयपीएलच्या ४५ दिवसात ते खेळाडूंचे मालकच असतात. यादरम्यान ते खेळाडूंकडून विविध ब्रँडच्या जाहिराती शूट करून घेतात. याचा मोबदला केवळ आणि केवळ टीम मालकांना मिळतो. आता इन्कमचा शेवटचा सोर्स म्हणजे विनिंग अमाऊंट. आयपीएल जिंकणाऱ्या टीमला मिळतात २० कोटी. आता शेकडो करोडोंमध्ये खेळणाऱ्या फ्रॅंचाईजींसाठी ही रक्कम म्हणजे पानावरचा चुनाच. त्यामुळे जिंकले तरी ही रक्कम बोनस म्हणून खेळाडूंनाच वाटण्यात येते, असे अनेकांनी सांगितले आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वाचा –
खेळाडू मैदानावर बॉल पँटवर का घासतात? जाणून घ्या कारण
मोठी बातमी! भारताची सुवर्ण इतिहासाला गवसणी, ७३ वर्षांत पहिल्यांदाच जिंकला ‘थॉमस कप’