क्रीडा मंत्रालयाने 2024 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. यावेळी क्रीडा विश्वात इतिहास रचणाऱ्या 4 खेळाडूंना देशाचा हा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मिळाला. मनू भाकर, डी गुकेश, प्रवीण कुमार आणि हरमनप्रीत सिंग हे खेलरत्न पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या चौघांना बक्षीस म्हणून किती रक्कम मिळते? चला तर मग, या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे देतो.
खेलरत्न पुरस्कार मिळणाऱ्या खेळाडूंना 25 लाख रुपयांची रोख रक्कम दिली जाते. याशिवाय त्यांना पदक आणि प्रमाणपत्र दिलं जातं. 2020 पर्यंत खेलरत्न मिळणाऱ्या खेळाडूला 7.5 लाख रुपयांची बक्षीस रक्कम मिळत होती. मात्र त्यानंतर केंद्र सरकारनं ही रक्कम वाढवून ती 25 लाख रुपये केली.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकून इतिहास रचणाऱ्या मनू भाकरला यापूर्वी खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकन मिळालं नव्हतं. यावरून बराच वाद झाला. त्यानंतर क्रीडा मंत्रालयानं छपाईमध्ये चूक झाल्याचं स्पष्ट केलं होतं. आता मनू भाकर हिला हा पुरस्कार मिळाला आहे. त्याच्यासोबत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगलाही खेलरत्न मिळाला आहे. नुकताच बुद्धिबळात इतिहास रचणाऱ्या डी गुकेशलाही हा पुरस्कार मिळाला. याशिवाय पॅरा ॲथलीट प्रवीण कुमारला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. या खेळाडूंचा सत्कार समारंभ 17 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रपती भवनात होईल.
यावर्षीच्या खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांमध्ये एकाही क्रिकेटपटूचा समावेश नाही, जे आश्चर्यकारक आहे. त्याचबरोबर क्रिकेटशी संबंधित कोणत्याही व्यक्तीचं नाव प्रशिक्षकाच्या पुरस्कार श्रेणीत समाविष्ट नाही.
हेही वाचा –
मेजर ध्यानचंद ‘खेलरत्न’ पुरस्काराची घोषणा; गुकेश, मनू भाकरसह या 4 खेळाडूंना मिळाला सर्वोच्च सन्मान
सिडनी कसोटीत आकाश दीपच्या जागी कोण खेळणार? हे 3 खेळाडू शर्यतीत
रोहित शर्माला सिडनी कसोटीतून वगळणार? गौतम गंभीरच्या या उत्तराने सगळेच थक्क