भारतीय संघानं 17 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर दुसऱ्यांदा टी20 विश्वचषकावर नाव कोरलं. आता रोहित ब्रिगेड एअर इंडियाच्या विशेष विमानानं ट्रॉफी घेऊन भारतात येत आहे. भारतीय संघाच्या आगमनासाठी देशात खास सेलिब्रेशनची तयारी सुरू आहे.
भारतीय संघ 4 जुलैला मुंबईत खुल्या बसमधून विजयी परेड काढणार आहे. मात्र तुम्ही मुंबईत राहत नसला तरी काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या घरात राहूनही ही विजयी परेड लाईव्ह पाहू शकता. या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला टीम इंडियाच्या विजयी परेडच्या लाईव्ह स्ट्रीमिंगची संपूर्ण माहिती देणार आहोत.
भारतीय संघ बार्बाडोसहून 4 जुलै रोजी सकाळी 6 वाजता दिल्ली विमानतळावर पोहोचेल. यानंतर विश्वचषक विजयाच्या खास सेलिब्रेशनसाठी विजयी परेडचं आयोजन करण्यात आलं आहे. ही विजयी परेड मुंबईत आयोजित करण्यात आली आहे, जी संध्याकाळी 5 वाजल्यापासून सुरू होईल. भारतीय संघाची ही परेड चाहत्यांना घरबसल्या थेट पाहता येणार आहे. चाहते ‘स्टार स्पोर्ट्स’ चॅनलवर भारतीय संघाची विजयी परेड पाहू शकतील.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं त्याच्या अधिकृत X खात्यावरून या सेलिब्रेशनसंदर्भात एक खास पोस्ट शेअर केली आहे. रोहितनं लिहिलं की, “आम्हाला तुमच्यासोबत या खास क्षणाचा आनंद घ्यायचा आहे. चला तर मग, 4 जुलै रोजी मरीन ड्राईव्ह आणि वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 5 वाजता विजय परेडच्या माध्यमातून आनंद साजरा करूया. ट्रॉफी घरी येत आहे.”
रोहित शर्मा शिवाय बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्वीट करत टीम इंडियाच्या विजय परेडमध्ये सामील व्हायचं आवाहन केलं आहे. “4 जुलै रोजी मरीन ड्राईव्ह आणि वानखेडे स्टेडियम येथे संध्याकाळी 5:00 वाजेपासून आमच्यासोबत आनंद साजरा करा”, असं ट्वीट त्यांनी केलं.
महत्त्वाच्या बातम्या-
धोनीच्या वाढदिवसाची ठिकठिकाणी जोरदार तयारी! या शहरांमध्ये होणार बायोपिकचं स्पेशल स्क्रिनिंग
झिम्बाब्वेविरुद्ध 8 वर्षांपासून हरलेला नाही भारत, टी20 मध्ये आहे जबरदस्त रेकॉर्ड!
हा ‘कुंभकर्ण’ खेळाडू कोण? ज्याची झोपेमुळे चुकली टीम बस! भारताविरुद्धच्या सामन्यात बसावं लागलं बाहेर