टी-२० विश्वचषक २०२६ साठी सर्व संघ तयारी करत असतानाच पाकिस्तान संघाची मात्र वेगळीचं नाटक सुरू आहेत. सुरूवातीला टी-२० विश्वचषक २०२६ वर बहिष्कार टाकण्याच्या धमक्यांनंतर आता पाकिस्तानचा संघ आयसीसी स्पर्धा खेळणार आहे. पण भारताविरूद्ध सामन्यावर बहिष्कार घातला जाणार आहे. अशा स्थितीत आयसीसीच्या खेळाच्या नियमांनुसार काय प्रक्रिया असते आणि भारताला ‘वॉकओव्हर’ (एकतर्फी विजय) मिळवण्यासाठी काय करावं लागेल, हे जाणून घेऊया.
पाकिस्तान सरकारने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भारताविरूद्ध सामन्यावर बहिष्कार टाकत असल्याचं जाहीर केलं. निवेदनात सांगण्यात आलं की, पाकिस्तान संघाला स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली असली तरी १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी संघ मैदानात उतरणार नाही. उर्वरित विश्वचषक सामन्यांसाठी खेळाडूंना खेळण्याची परवानगी मिळल्याची माहिती खेळाडूंदेखील सोशल मीडियावरील पोस्टमधून समजली.
आयसीसीच्या खेळाच्या अटींनुसार, केवळ एखाद्या संघाने सामना न खेळण्याची घोषणा केल्याने लगेच वॉकओव्हर दिला जात नाही. नाणेफेकीच्या ठरलेल्या वेळेस एखादा संघ मैदानावर उपस्थित न राहिल्यास सामना अधिकृतरीत्या गमावल्याचे (forfeit) जाहीर केले जाते. त्या क्षणापर्यंत सामना नियोजित वेळापत्रकानुसारच असल्याचं गृहित धरलं जातं.
आयसीसीच्या या नियमानुसार भारताला सर्व सामन्यादिवशीच्या औपचारिक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव ठरलेल्या वेळेत मैदानावर पोहोचून नाणेफेकीसाठी उपस्थित राहील, अशी अपेक्षा आहे. जर पाकिस्तान संघ नाणेफेकीसाठी मैदानावर हजर राहिला नाही, तर सामना पंच अधिकृतपणे भारताला वॉकओव्हर देतील, ज्यामुळे गटातील गुणतालिकेत भारताला दोन गुण मिळतील. यामुळे भारताची तयारीही नेहमीप्रमाणेच सामन्यासाठी केली जाईल. सामना रद्द करण्याचा किंवा वॉकओव्हर जाहीर करण्याचा अधिकार फक्त सामना पंचांकडे असेल.
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवसापर्यंत पाकिस्तानची भूमिका बदलली नाही, तर निकाल एका क्षणावर अवलंबून असेल, पाकिस्तान संघ नाणेफेकीसाठी मैदानावर येतो की नाही, यावर सर्वांच्या नजरा असतील. पाकिस्तान संघ न आल्यास, आयसीसीच्या नियमांनुसार एकही चेंडू न टाकता सामना भारताने जिंकला, असं जाहीर करण्यात येईल. भारताविरुद्ध सामना न खेळल्यास पाकिस्तानला दोन गुण गमवावे लागतील, शिवाय त्यांचा नेट रनरेटही घसरू शकतो. त्यामुळे त्यांना गट टप्प्यातील नेदरलँड्स, अमेरिका आणि नामिबियाविरूद्ध सामने जिंकणं अनिवार्य ठरणार आहे. यापैकी एकही सामना गमावल्यास पाकिस्तानवर लवकर स्पर्धेबाहेर पडण्याचा धोका असेल.
दरम्यान, आयसीसीने पाकिस्तान सरकारच्या निवेदनाची दखल घेतली असली, तरीही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून (PCB) अधिकृत पत्रव्यवहाराची प्रतीक्षा असल्याचं स्पष्ट केलं आहे. आयसीसीने आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं की, एका संघाविरुद्धच्या सामन्यावर बहिष्काराच्या सोयीस्कर वागण्यामुळे खेळभावनेला ठेच पोहोचते आणि स्पर्धेचं निकोप वातावरणही बिघडतं असं आयसीसीने म्हटलं आहे. पाकिस्तानने अशा प्रकारे एका लढतीवर बहिष्कार टाकला तर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात, असा इशाराही आयसीसीने दिला आहे.





