अभिषेक शर्मा जगभरातील गोलंदाजांसाठी एका भयावह स्वप्नासारखा असला, तरी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीकडे या भारतीय सलामीवीरासाठी एक सोपी रणनीती आहे. ती म्हणजे सतत अचूक गोलंदाजी करून त्याला दबावाखाली ठेवणे. विशाखापट्टणम येथील चौथ्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात हेन्रीने अभिषेकला ‘गोल्डन डक’ (पहिल्याच चेंडूवर बाद) केले होते, ज्यामुळे किवी संघाला हा सामना ५० धावांनी जिंकण्यास मदत झाली होती.
पाचव्या आणि अंतिम टी20 सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी बोलताना हेन्री म्हणाला, “गेल्या दोन वर्षांपासून तो शानदार कामगिरी करत आहे आणि केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येच नव्हे, तर आयपीएलमध्येही तो गोलंदाजीचा धैर्याने सामना करत आहे. मला असं वाटतं की, आम्ही त्याच्यावर कशा प्रकारे दबाव निर्माण करतो, हे आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे.”
तो पुढे म्हणाला, “गोलंदाजीच्या दृष्टीकोनातून हे आव्हानात्मक आहे, पण जेव्हा तुम्ही एखाद्या षटकात संमिश्र कामगिरी करता (धुलाई होते), तेव्हा त्यानंतर तुम्ही कशा प्रकारे पुनरागमन करता आणि आपला प्रभाव पाडता, हे महत्त्वाचे असते.” हेन्रीने पुढे नमूद केले की, “सगळं काही तुम्ही किती अचूक गोलंदाजी करता यावर अवलंबून आहे. तुम्हाला तुमच्या कामात अचूक असावे लागेल आणि आपले सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करावा लागेल.”
भारताविद्धच्या या मालिकेतील अनुभव आगामी टी20 विश्वचषकात न्यूझीलंडसाठी उपयुक्त ठरेल, अशी आशा हेन्रीने व्यक्त केली. तो म्हणाला, “माझ्यासाठी टी20 क्रिकेट हे आत्मविश्वासाशी संबंधित आहे. जेव्हा तुम्ही दबावाखाली असता, तेव्हा तुम्ही कसे पुनरागमन करता आणि फलंदाजांना कशा प्रकारे आव्हान देता, हे महत्त्वाचे असते. सतत खेळल्यामुळे तुम्ही सातत्याने शिकत राहता आणि मला वाटते की आमच्यासाठी या मालिकेचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.”
हेन्री म्हणाला, “अशा प्रकारच्या दबावाखाली येणे कधीही चांगले वाटत नाही, पण आम्हाला माहित होते की आमचे दीर्घकालीन ध्येय विश्वचषकाची तयारी करणे हे आहे; आणि जेव्हा समोरचे संघ अशा प्रकारे उत्कृष्ट कामगिरी करत असतात, तेव्हा तुम्ही त्यांच्यावर दबाव कसा टाकू शकता, हे पाहणे महत्त्वाचे असते.” तो शेवटी म्हणाला, “या दृष्टीकोनातून पाहिले तर ही मालिका आमच्यासाठी सकारात्मक राहिली आहे. आमच्या खेळाडूंनी शेवटच्या सामन्यातही आपला आत्मविश्वास कायम राखणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.”






