गोवा। सातव्या हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) हैदराबादने ओडिसावर १-० असा विजय मिळविला. स्पेनचा स्ट्रायकर एरिडेन सँटाना याने पहिल्या सत्रात पेनल्टीवर केलेला गोल निर्णायक ठरला.
बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर ही लढत झाली. मॅन्यूएल मार्क्वेझ यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या हैदराबादने पूर्वार्धात संधीचा फायदा घेतला. स्टुअर्ट बॅक्सटर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या ओडिसाला निर्णायक चाली रचता आल्या नाही.
यादरम्यान ३४व्या मिनिटाला हैदाराबादचा मध्यरक्षक हालीचरण नर्झारी याने मध्य क्षेत्रात चेंडूवर ताबा मिळवून आगेकूच केली. तो नेटच्या दिशेने फटका मारत असतानाच ओडिसाचा बचावपटू स्टीव्हन टेलर याने मैदानावर घसरत त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्याच्या दंडाला चेंडू लागला. त्यामुळे पंच तेजस नागवेकर यांनी टेलरला येलो कार्ड दाखवत हैदराबादला पेनल्टी बहाल केली.
ही पेनल्टी घेण्यासाठी सँटाना पुढे सरसावला. त्याने सफाईदार फटका मारला. ओडिसाचा गोलरक्षक अर्शदीप सिंग याने उजवीकडे झेप टाकली, पण तो गोल रोखू शकला नाही.
पाचव्या मिनिटाला हैदराबादने प्रयत्न केला. मध्य फळीतील लुईस सॅस्त्रेने कॉर्नरवर फटका मारला. गोलक्षेत्रात सँटानाला संधी मिळाली. त्याने उंच उडी घेत हेडिंग केले, पण त्यात अचूकता नव्हती. दोन मिनिटांनी हैदराबादने पुन्हा मुसंडी मारली. मध्य फळीतील आकाश मिश्राने आगेकूच करीत ताकदीने फटका मारला, पण चेंडू अर्शदीपच्या फार जवळ होता. त्यामुळे अर्शदीप तो सहज थोपवू शकला. मग चेंडू हैदराबादचा मध्यरक्षक महंमद यासीर याच्या दिशेने गेला, पण तो ऑफसाईडच्या स्थितीत होता.
१२व्या मिनिटाला हैदराबादने ओदीशाच्या बचाव फळीवर पुन्हा दडपण आणले. त्यावेळी उजवीकडे मध्य फळीतील निखील पुजारीने पास मिळताच आगेकूच केली, पण स्वैर फटक्यामुळे तो फिनिशिंग करू शकला नाही.
दुसऱ्या सत्रात ५८व्या मिनिटाला ओडिसाचा स्ट्रायकर दिएगो मॉरीसिओ याच्या अपयशी प्रयत्नानंतर आघाडी फळीतील सहकारी मॅन्युएल ओन्वू याने फटका मारला, पण तो हैदराबादचा गोलरक्षक सुब्रत पॉल याने आरामात अडविला. ७८व्या मिनिटाला लुईसच्या चालीवर सँटानाने हेडिंग केले, पण चेंडू नेटवरून बाहेर गेला.
अखेरच्या काही मिनिटांत ओडिसाचा मॉरीसिओ आणि हैदाराबादचा लिस्टन कोलॅको यांना फिनिशिंग करता आले नाही.