मागील पर्वातील उपांत्य फेरीच्या सामन्याची पुनरावृत्ती हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३मध्ये (आयएसएल) शनिवारी (26 नोव्हेंबर) झालेली दिसणार आहे. यजमान एटीके मोहन बागान आणि गतविजेता हैदराबाद एफसी यांच्यात येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगण येथे लढत होणार आहे. गतवर्षी हैदराबादने प्ले ऑफमध्ये मोहन बागानचे आव्हान संपुष्टात आणले होते आणि त्यानंतर जेतेपद पटकावले होते. यावेळी ज्युआन फेरांडोचा संघ त्या पराभवाची परतफेड करण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरणार आहेत.
मागील लढतीत एटीके मोहन बागानला ०-३ अशा फरकाने एफसी गोवाकडून हार पत्करावी लागली होती. तो पराभव विसरून यजमान मोहन बागानला मैदानावर चांगली कामगिरीसाठी प्रयत्नशील रहावे लागणार आहे. यंदाच्या पर्वात प्रथमच एटीके मोहन बागानला सामन्यात गोल करण्यात अपयश आले होते. हिरो आयएसएल २०२१-२२मध्ये जमशेदपूर एफसीविरुद्ध १-० असा पराभव मोहन बागानला पत्करावा लागला होता. त्यानंतर त्यांची गोलपाटी कोरी राहण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
एफसी गोवाविरुद्ध पराभव झाला असला तरी फेरांडो त्यांच्या सुरूवातीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याच्या तयारीत दिसत नाहीत. लिस्टन कोलासो, दिमित्री पेट्राटोस आणि मनवीर सिंग यांनी उल्लेखनीय खेळ केलाय खरा, परंतु त्यांना गोवाविरुद्ध गोल करता आला नव्हता. मध्यरक्षक जोनी काऊकोची अनुपस्थिती ही फेरांडो यांच्यासाठी मोठी डोकेदुखी आहे. मागील सामन्यात त्याला दुखापत झाली होती.
”आम्ही वर्तमानाचा आणि पुढच्या सामन्याचा विचार करत आहोत. एफसी गोवाविरुद्धचा निकाल हा सर्वांसाठी निराशाजनकच होता, परंतु त्याला पाच दिवस उलटून गेले. आता उद्याचा सामना हा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. तीन गुण मिळवण्याची ही नवीन संधी आहे आणि आम्ही त्यासाठी तयार आहोत,”असे फेरांडो म्हणाले.
हैदराबाद एफसीची अपराजित मालिका मागील आठवड्यात केरळा ब्लास्टर्सने खंडित केली. गतविजेत्या हैदराबादला या पर्वात प्रथमच गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमणी याच्याशिवाय खेळावे लागले. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे आणि आता त्याला या संपूर्ण पर्वाला मुकावे लागणार आहे. ३३ वर्षीय लक्ष्मिकांतने उल्लेखनीय कामगिरी केली आणि चार सामन्यांत प्रतिस्पर्धींना एकही गोल करू दिला नाही. त्याच्या अनुपस्थितीत अनुज कुमारला संधी मिळाली आहे.
”हा सामना सोपा नक्की नसेल. त्यांच्याकडे दर्जेदार कामगिरी करणारे परदेशी खेळाडू आहेत आणि त्यात भारताच्या राष्ट्रीय संघाचे सदस्य असलेले देशातील अव्वल युवा खेळाडूही आहेत. त्यामुळे आमच्यासाठी हा आव्हानात्मक सामना असणार आहे. या लीगमध्ये कोणताही संघ कोणालाही पराभूत करू शकतो. दोन चांगल्या संघांमध्ये चांगला खेळ पाहायला मिळणार आहे, बघू काय होतं ते,”असं हैदराबाद एफसीचे मुख्य प्रशिक्षक मॅनोलो मार्क्यूझ म्हणाले.
एटीके मोहन बागानविरुद्ध आतापर्यंत झालेल्या सामन्यातील आकडेवारी गतविजेत्या हैदराबादच्या बाजूने नाही. ८ पैकी त्यांना केवळ १ विजय मिळवता आला आहे आणि तोही मागील पर्वातील प्ले ऑफ सामन्यात. एटीके मोहन बागानने ३ विजय मिळवले आहेत, तर ४ सामने अनिर्णित राहिले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जणू लाईफ लाईन परतली… ! स्टेडियमवर पुन्हा परतल्याने एफसी गोवा संघाचे फॅन्स आनंदी
एफसी गोवाची गाडी सूसाट; सलग चार पराभव पत्करणाऱ्या बंगळुरू एफसीला देणार टक्कर





