गोवा, दिनांक ११ फेब्रुवारी – इंडियन सुपर लीगच्या ( आयएसएल) शुक्रवारी झालेल्या सामन्यात हैदराबाद एफसीने विजय मिळवताना अव्वल स्थानावरील पकड अधिक धट्ट केली. बंगलोर एफसीविरुद्धच्या सामन्यात हैदराबादने पहिल्या हाफमध्येच दोन गोल करून वर्चस्व गाजवले होते. झेव्हियर सिव्हेइरो ( १६ मि.) व जाओ व्हिक्टर ( ३० मि. ) यांनी हे गोल केले. मध्यंतरानंतर त्यांना बंगलोरने गोल करण्यापासून रोखले. पण, बंगलोरलाही बरोबरीचा गोल करता आला नाही. त्यांच्याकडून सुनील छेत्रीने ८७ व्या मिनिटाला एकमेव गोल केला आणि तो विक्रमी ठरला. आयएसएलमध्ये ५० गोल करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. हैदराबादने २-१ असा विजय मिळवताना २९ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले.
चौथ्या मिनिटाला कॉर्नर मिळूनही बंगलोर एफसीला गोल करता आला नाही. दोन्ही संघ बचावफळीवर भर देताना दिसले, परंतु १६व्या मिनिटाला हैदराबादने बंगलोरची बचावभींत भेदली. १६व्या मिनिटाला झेव्हियर सिव्हेइरोने पेनल्टी बॉक्समधून सुरेख गोल केला. चेंडू वेग एवढा होता की बंगलोरचा गोलरक्षक गुरप्रीत संधूला अडवता आला नाही. चेंडू त्याच्या हाताला लागून गोलजाळीत विसावला. २३व्या मिनिटाला बार्थो ऑग्बेचे गोल करण्याच्या अगदी जवळ गेला होता, परंतु यावेळेस गुरप्रीत सिंधूने चेंडू अडवला. पुढच्याच मिनिटाला बंगलोरला फ्री किक मिळाला, परंतु रोशन सिंगला बरोबरीचा गोल करता आला नाही. पण, ३०व्या मिनिटाला हैदराबाद एफसीने संधीचे सोने केले. जाओ व्हिक्टरने थेट गोलजाळीवर निशाणा साधताना पुन्हा गुरप्रीत संधूला चकवले आणि हैदराबादला २-० अशी आघाडी मिळवून दिली.
रोहित दानू डाव्या बाजूने सातत्यानं बंगलोरच्या बचावपटूंवर वरचढ होत होता. दानू आणि निखिल पूजारी यांनी बंगलोरच्या आक्रमणाला चांगले थोपवले. पहिल्या ४५ मिनिटांच्या खेळात हैदराबादने वर्चस्व राखले. दुसऱ्या हाफमध्ये बंगलोरने एक बदल केला. दानूला रोखण्यासाठी बंगलोरने नामग्याल भुतियाला मैदानावर उतरवले. पण, त्याचा फार काही फरक पडलेला दिसला नाही. हैदराबाद सातत्याने आक्रमण करताना दिसले. ८०व्या मिनिटापर्यंत बंगलोरकडून तीन प्रयत्न झाले, परंतु ते ऑफ टार्गेट राहिले. अखेरच्या १० मिनिटांत हैदराबाद बचावात्मक पवित्र्यात गेले. ८०व्या मिनिटाला सुनील छेत्रीने ६ यार्डावरून एक हेडर मिस केला आणि बंगलोरची पाटी कोरीच राहिली.
८२व्या मिनिटाला रोशन नाओरेम सिंगला पिवळे कार्ड दाखवण्यात आले आणि साखळी फेरीतील हे त्याचे चौथे कार्ड असल्याने त्याला पुढील सामन्याला मुकावे लागणार आहे. बंगलोरसाठी हा आणखी एक मोठा धक्का आहे. ८७व्या मिनिटाला बंगलोरला पहिला गोल करण्यात यश मिळाले. उदांता सिंगच्या क्रॉसवर छेत्रीने सुरेख गोल केला. आयएसएलच्या इतिहासात ५० गोल करणारा छेत्री हा पहिलाच खेळाडू ठरला. त्याने बार्थो ऑग्बेचेला ( ४९) मागे टाकले. पण, बंगलोरला अखेरच्या काही मिनिटांत बरोबरीचा गोल करता आला नाही आणि हैदराबादने २-१ अशी बाजी मारली.
निकाल – हैदराबाद एफसी २ ( झेव्हियर सिव्हेइरो १६ मि., जाओ व्हिक्टर ३० मि. ) विजयी विरुद्ध बंगलोर एफसी १ ( सुनील छेत्री ८७ मि.)






