गोवा दिनांक ३१ जानेवारी – यंदाच्या पर्वातील सर्वात कमकुवत बचावफळी असलेल्या नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीचा इंडियन सुपर लीगच्या ( आयएसएल) आजच्या सामन्यात हैदराबाद एफसीसमोर निभाव लागणार नाही, असा अंदाज आधीच लावला गेला होता. आयएसएल २०२२ मध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या हैदराबादच्या आक्रमणासमोर नॉर्थ ईस्ट युनायटेडला तग धरताच आला नाही. पुन्हा एकदा बार्थोलोमेव ऑग्बेचेने विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याने आजच्या सामन्यात दोन ( ३ मि. व ६० मि.) गोल करून आयएसएलच्या इतिहासात सर्वाधिक ४९ गोल्स करण्याचा विक्रम नावावर केला.
यंदाच्या पर्वातही सर्वाधिक १४ गोल्स ऑग्बेचेच्याच नावावर आहेत. हैदराबादने ५-० अशा निकालासह विजयी हॅटट्रिक साजरी करताना २६ गुणांनी अव्वल स्थानावरील पकड घट्ट केली. एससी ईस्ट बंगाल ( ४-०) व ओदिशा एफसी ( ३-२) यांच्यानंतर हैदराबादनं सलग तिसऱ्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. आजच्या सामन्यात ऑग्बेचेसह आकाश मिश्रा ( ४५+२ मि.), निखिल पुजारी ( ८४ मि.) व एडू गार्सिया ( ८८ मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. बचावफळीतील अपयशाने यंदा नॉर्थ ईस्ट युनायटेडला मोठा धक्का दिला आहे. त्यामुळेच यंदाच्या पर्वात नॉर्थ ईस्ट युनायटेडविरुद्ध प्रतिस्पर्धींनी सर्वाधिक ३३ गोल केले आहेत.
टेबल टॉपर हैदराबाद एफसीने पहिल्या पाच मिनिटांतच आपला दम दाखवून नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीला बॅकफूटवर फेकले. तिसऱ्या मिनिटाला मिळालेल्या कॉर्नरवरून आलेल्या पासवर कर्णधार जाओ व्हिक्टर यानं हेडरद्वारे चेंडू गोलपोस्टच्या दिशेने पाठवला, परंतु तो क्रॉस बारवर आदळून माघारी फिरला. त्याचवेळी ६ यार्ड बॉक्समध्ये असलेल्या ऑग्बेचेने वेगाने चेंडूला पुन्हा गोलजाळीत पाठवून हैदराबादचे खाते उघडले. ४५+२ मिनिटाला अखेर आकाश मिश्राला यश आले. कॉर्नरवरून आलेला चेंडू आकाशने अप्रतिम हेडरद्वारे गोलजाळीत पाठवला अन् हैदराबादने पहिल्या हाफमध्ये २-० अशी मजबूत आघाडी घेतली. पूर्वाधात दोन्ही संघांनी समसमान चेंडूवर ताबा राखला, परंतु हैदराबादने ४ ऑन टार्गेट व ३ ऑफ टार्गेत असे गोल करण्याचे ७ प्रयत्न केले. दुसरीकडे नॉर्थ ईस्ट युनायटेडकडून दोनच प्रयत्न झाले. मार्को सॅहनेक वगळल्यास नॉर्थ ईस्ट युनायटेडकडून पहिल्या हाफमध्ये कुणी प्रभाव पाडू शकले नाही.
मध्यंतरानंतर नॉर्थ ईस्ट युनायटेडच्या खेळात सुधारणा जाणवली, परंतु हैदराबादच्या तोडीचा खेळ करण्यात ते कमी पडताना दिसले. ६०व्या मिनिटाला हैदराबादला पेनल्टी बॉक्स जवळच फ्री किक मिळाली. पण, पहिल्या प्रयत्नात हैदराबादला अपयश आले. मात्र, दुसऱ्या प्रयत्नात ऑग्बेचेने बसल्या-बसल्या बायसिकल किक मारून हैदराबादसाठी तिसरा गोल केला. या गोलसह ऑग्बेचे आयएसएलच्या इतिहासात सर्वाधिक ४९ गोल्स करणारा खेळाडू ठरला. त्याने फेरान कोरोमिनास व सुनील छेत्री ( प्रत्येकी ४८ गोल्स) यांना मागे टाकले. ७१व्या मिनिटाला सुहैर वेदाक्केपीडिकानं सुरेख गोल केला अन् नॉर्थ ईस्ट युनायटेडच्या ताफ्यात आनंदाची लाट आली, परंतु ती क्षणिक ठरली. अम्पायरने ऑफ साईड दिल्याने नॉर्थ ईस्ट युनायटेडचा गोल नाकारण्यात आला.
आयएसएलमध्ये ५०वा सामना खेळणाऱ्या निखिल पुजारीने ८४व्या मिनिटाला लाँग रेंजवरून हैदराबादसाठी चौथा गोल केला. चार मिनिटानंतर झेव्हियर सिव्हिरीयोनं चतुराईनं दिलेल्या पासवर एडू गार्सियानं गोल करून हैदराबादची आघाडी ५-० अशी मजबूत केली आणि याच फरकानं त्यांचा विजयही पक्का झाला.
निकाल – हैदराबाद एफसी ५ ( बार्थोलोमेव ऑग्बेचे ३ मि. व ६० मि., आकाश मिश्रा ४५+२ मि., निखिल पुजारी ८४ मि., एडू गार्सिया ८८ मि.) विजयी विरुद्ध नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी ०.