गोवा| सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) सोमवारी हैदराबाद एफसीने आपल्या मोहिमेत जान आणताना चेन्नईयीन एफसीवर 4-1 असा दणदणीत विजय मिळविला. भारताचा 26 वर्षीय आंतरराष्ट्रीय खेळाडू हालीचरण नर्झारी याने दोन गोलांसह विजयात मोलाचा वाटा उचलला. उत्तरार्धातील धुमश्चक्रीत हैदराबादने आधी तीन मिनिटांच्या आणि मग पाच मिनिटांच्या अंतराने प्रत्येकी दोन गोल करीत चेन्नईयीनच्या आव्हानातील हवाच काढून घेतली.
बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर हा सामना झाला. पहिल्या सत्राअखेर उभय संघांमध्ये गोलशून्य बरोबरी होती. दुसऱ्या सत्रात हैदराबादने पकड घेतली. आघाडी फळीतील ऑस्ट्रेलियाचा 30 वर्षीय खेळाडू जोएल चायनेस याने 50व्या मिनिटाला संघाचे खाते उघडले. त्यानंतर तीन मिनिटांत मध्य फळीतील नर्झारी याने संघाचा दुसरा गोल केला. अनिरुध थापाने चेन्नईयीनची पिछाडी कमी केली, पण त्यानंतर हैदराबादचा तिसरा गोल मध्य फळीतील ब्राझीलचा 32 वर्षीय खेळाडू जोओ व्हिक्टर याने केला. मग नर्झारीने वैयक्तिक दुसरा व संघाचा चौथा गोल नोंदविला.
हैदराबादचा हा 9 सामन्यांतील तिसरा विजय असून तीन बरोबरी व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 12 गुण झाले. त्यांनी गुणतक्त्यात सहावे स्थान गाठले. पाचव्या क्रमांकावरील बेंगळुरू एफसीला त्यांनी गुणांवर गाठले, पण बेंगळुरूचा 2 (11-9) गोलफरक हैदराबादच्या 0 (11-11) गोलफरकापेक्षा सरस ठरला. हैदराबाद पहिल्या पाच सामन्यांत अपराजित होता. त्यानंतर त्यांना सलग तीन पराभव पत्करावे लागले होते. स्पेनचे मॅन्युएल मार्क्वेझ प्रशिक्षक असलेल्या संघाने ही अपयशी मालिका धडाक्यात संपुष्टात आणली.
चेन्नईयीनला 9 सामन्यांत तिसरा पराभव पत्करावा लागला. दोन विजय व चार बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे 10 गुण कायम राहिले. गुणतक्त्यात त्यांची आठव्या क्रमांकावर घसरण झाली. एटीके मोहन बागान 9 सामन्यांतून 20 गुणांसह आघाडीवर आहे. मुंबई सिटी एफसी 8 सामन्यांतून 19 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर तिसऱ्या क्रमांकावरील एफसी गोवा संघाचे 9 सामन्यांतून 14 गुण आहेत.
दुसऱ्या सत्राच्या प्रारंभी हैदराबादचा स्ट्रायकर अरीडेन सँटाना याने चायनेसला पास दिला. त्यावेळी चेन्नईयीनचा बचावपटू एलि साबिया याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू चायनेसच्या शरीराला लागून नेटमध्ये गेला. त्यावेळी चेन्नईयीनचा गोलरक्षक विशाल कैथ आधीच पुढे आला होता. त्यामुळे त्याला चेंडू अडवण्याची संधीच मिळाली नाही. त्यानंतर सँटानानेच घोडदौड करीत बॉक्सलगतच्या भागातून नेटच्या दिशेने चेंडू मारला. कैथने सुरवातीला चेंडू थोपवला, पण हा चेंडू आपल्या दिशेने येताच नर्झारीने ताकदवान फटक्याच्या जोरावर अफलातून फिनिशींग केले.
चेन्नईयीनने 14 मिनिटांत खाते उघडताना पिछाडी कमी केली. मध्य फळीतील भारताचा 22 वर्षीय आंतरराष्ट्रीय खेळाडू अनिरुध थापा याने हा गोल केला. बचाव फळीतील रिगन सिंग याने मारलेला चेंडू अडविताना हैदराबादचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याने पायाने प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या पायाला लागून थापा याच्या दिशेने केला. मग थापाने उरलेले काम चोखपणे पार पाडले.
हैदराबादाचा बदली स्ट्रायकर फ्रॅन सँडाझा याने बॉक्समधून मारलेला फटका कैथने थोपविला, पण मध्यरक्षक महंमद यासीर याने चपळाईने चेंडूवर ताबा मिळवित तो व्हिक्टर याच्या दिशेने मारला. त्यावेळी बॉक्सलगतच असलेल्या व्हिक्टरने दमदार फटका मारत लक्ष्य साधले. त्यानंतर सँडाझानेच प्रतिआक्रमण रचत मध्य क्षेत्रातून घोडदौड केली. त्याने पास देताच नर्झारीने जोरदार घोडदौड करीत कैथला चकवून वैयक्तिक दुसरा व संघाचा चौथा गोल करीत निकाल जवळपास निश्चित केला.
पहिल्याच मिनिटाला हैदराबादने प्रयत्न केला. बचावपटू ओडेई ओनैन्डीया याने स्ट्रायकर अरीडेन सँटाना याच्या दिशेने लांब पास दिला. त्यातून स्ट्रायकर जोएल चायनेस याला संधी मिळाली. उजवीकडून चायनेसने केलेल्या आक्रमणाचा अचूक अंदाज घेत चेन्नईयीनचा गोलरक्षक विशाल कैथ याने चेंडू थोपवला, जो नंतर बचावपटू जेरी लालरीनझुला याने ताब्यात घेतला. या सकारात्मक सुरवातीची फळे हैदराबादला उत्तरार्धात मिळाली.
संबधित बातम्या:
आयएसएल २०२० : मुंबई सिटी एफसीने केरला ब्लास्टर्सवर विजय मिळवत घेतली गुणतक्त्यात आघाडी
आयएसएल २०२०: हैदराबादविरुद्ध गोव्याची पिछाडीवरून बाजी
आयएसएल २०२०: आज हैदराबाद एफसी विरुद्ध एफसी गोवा संघात रंगणार सामना