---Advertisement---

हैदराबाद एफसी-एटीके मोहन बागान यांच्यात आज ‘रॉयल’ युद्ध!

On: शुक्रवार, मार्च 11, 2022 5:12 PM
Hyderabad-FC
---Advertisement---

गोवा: आक्रमणाची तीव्र धार असलेला हैदराबाद एफसी आणि पर्वात सलग १५ सामने अपराजित राहून विक्रमाची नोंद करणाऱ्या एटीके मोहन बागान यांच्यात इंडियन सुपर लीगच्या ( आयएसएल) दुसऱ्या सेमीफायनलच्या पहिल्या लेगची लढत शनिवारी होणार आहे. बाम्बोलिम येथील दी ऍथलेटिक स्टेडियमवर ही ‘रॉयल’ लढत रंगणार आहे. हैदराबाद एफसी सर्व आघाड्यांवर वरचढ वाटत असली तरी ज्युआन फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखाली एटीके मोहन बागानचा खेळ कमालीचा उंचावला आहे. पर्वाच्या मध्यंतराला अँटोनियो लोपेझ यांच्याशी करार मोडून एटीकेने फेरांडो यांची नियुक्ती केली आणि त्यानंतर या संघाने थेट उपांत्य फेरीत धडक मारली.

हैदराबाद एफसीचे हे आयएसएलमधील सर्वात यशस्वी पर्व ठरले आहे. साखळी फेरीअंती त्यांनी गुणतालिकेतील दुसरे स्थान मजबूत केले आणि प्रथमच उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांचा दबदबा या संपूर्ण स्पर्धेत पाहायला मिळाला. मॅनोलो मार्क्यूझ यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या हैदराबादने २० पैकी ११ सामने जिंकले आणि लीग शिल्डची पोल पोझिशन ( अव्वल स्थान) मिळवली होती, परंतु जमशेदपूर एफसीने महत्त्वाच्या सामन्यात त्यांना ३-० असे लोळवले आणि अव्वल स्थान हिसकावून घेतले. हा पराभव वगळल्यास साखळी फेरीत हैदराबादने निर्विवाद वर्चस्व गाजवले.
बार्थोलोमेव ऑग्बेचे हा त्यांच्या यशाचा शिल्पकार ठरला. त्याने १७ सामन्यांत १७ गोल केले आहेत. मागील दोन लढतींत त्याला आजारी असल्यामुळे खेळता आले नाही. ”आम्ही सावरलो आहोत. आम्ही आता तयार आहोत. शारीरिक तंदुरुस्तीच्या बाबतीत कोणतीच घाई करू इच्छित नाही आणि त्यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत आम्ही खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर लक्ष ठेऊन आहोत. तगड्या प्रतिस्पर्धीचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत,” असे मार्क्यूझ यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले,”आम्ही प्रथमच उपांत्य फेरीत धडक मारलीय, ही सर्वात चांगली गोष्ट आहे. त्यामुळे खेळाडू थोडे नर्व्हस आहेत, परंतु माझ्या मते ते मुक्तपणे खेळतील आणि या ऐतिहासिक क्षणाचा आनंद आम्हाला लुटायला हवा. आम्हाला आणखी चांगला खेळ करायला हवा, कारण आता स्पर्धेतील तगड्या चार संघांमध्ये चुरस आहे.”

एटीके मोहन बागानला फेरांडो यांनी जणू नवसंजीवनी दिली. त्यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर संघाने १४ सामन्यांत फक्त एकच पराभव पत्करला आणि गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले. चेंडू पास करत ठेवण्याच्या रणनीतीवर फेरांडो यांचा अधिक फोकस आहे आणि त्यामुळेच मोहन बागानने १५ सामन्यांत अपराजित मालिका कायम राखली होती. साखळी फेरीतील अखेरच्या लढतीत त्यांना जमशेदपूरकडून हार मानावी लागली.

लिस्टन कोलासो आणि मनवीर सिंग यांनी या संपूर्ण पर्वात दबदबा राखला. या दोघांनी मिळून १४ गोल्स केले. रॉय कृष्णा याने चेन्नईयन एफसीविरुद्ध पहिला गोल नोंदवला आणि डेव्हिड विलियम्सला चांगली साथ दिली. या दोघांची बाद फेरीतील कामगिरी उल्लेखनीय झालेली आहे. मागील दोन पर्वात विलियम्सने बाद फेरीत पाच गोल केले आणि एका गोलसाठी सहाय्य केले, तर कृष्णाच्या नावावर बाद फेरीच्या लढतीत पाच गोल सहाय्य व एक गोलची नोंद आहे. गोल सहाय्यच्या बाबतीत ही संयुक्तरित्या सर्वोत्तम कामगिरी आहे.

”स्पर्धेतीच खूपच चांगल्या संघाशी आमचा मुकाबला आहे. त्यांच्याकडे चांगले खेळाडू आहेत. २० सामन्यांनंतर हैदराबादला प्ले ऑफच्या लढतीचा आनंद लुटायचा आहे आणि त्यामुळेच त्यांना पराभूत करणे सोपं नक्की नाही. या पर्वातील त्यांच्या कामगिरीचा आलेख हा चढा राहिलेला आहे,”असे एटीकेचे प्रशिक्षक फेरांडो म्हणाले. हैदराबादचा खेळाडू ऑग्बेचेबाबत फेरांडो म्हणाले की,”त्याच्यासाठी आमच्याकडे खास रणनीती आहे आणि मी तुम्हाला आत्ताच ती समजावून सांगू शकत नाही. चेंडूवर ताबा राखणे, संधी निर्माण करणे आणि मग आक्रमण करणे, सध्या हाच आमचा प्लान आहे. ”

एटीके मोहन बागानने यंदाच्या पर्वात हैदराबाद एफसीविरुद्ध अपराजित मालिका राखली आहे. हैदराबादविरुद्धच्या दोनपैकी एका लढतीत २-२ अशी बरोबरी राहिली, तर एक सामना मोहन बागानने २-१ असा जिंकला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

केरलाविरुद्ध शील्ड विजेते जमशेदपूर ‘हॉट फेवरिट’ आयएसएल सेमीफायनल १ फर्स्ट लेग

क्या बात है! जमशेदपूर एफसीची ऐतिहासिक कामगिरी, विक्रमासह प्रथमच जिंकली लीग शिल्ड!

जरा इकडे पाहा! आठ गोलांनंतरही गोवा अन् केरलामधील सामना सुटला बरोबरीत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---