---Advertisement---

हैदराबाद-केरला ब्लास्टर्समध्ये आज फायनल; आयएसएलला मिळणार नवा विजेता

On: शनिवार, मार्च 19, 2022 6:25 PM
Hyderabad-FC-vs-Kerala-Blasters-FC
---Advertisement---

गोवा: आयएसएल अर्थात हिरो इंडियन सुपर लीग २०२१-२२च्या जेतेपदासाठी हैदराबाद एफसी आणि केरला ब्लास्टर्स एफसी यांच्या रविवारी (२० मार्च) महाअंतिम लढत रंगेल. फातोर्डा येथील पीजेएन स्टेडियमवर होणाऱ्या फायनलद्वारे आयएसएलला नवा विजेता मिळेल.

आठव्या हंगामात अंतिम फेरी गाठलेल्या केरला ब्लास्टर्सला फायनलमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. पहिल्यावहिल्या हंगामासह (२०१४-१५) तिसऱ्या हंगामातही (२०१६-१७) त्यांनी फायनल प्रवेश केला. मात्र, दोन्ही खेपेस ऍट्लेटिको डी कोलकाताकडून त्यांना मात खावी लागली. त्यानंतरच्या चार हंगामात अंतिम फेरीने हुलकावणी दिली तरी यंदा त्यांनी सर्वोत्तम कामगिरी करताना तिसऱ्यांदा आयएसएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला. हैदराबादने कमालीचे सातत्य राखताना प्रथमच अंतिम फेरी गाठली.

जवळपास दोन वर्षांनंतर होणाऱ्या आयएसएलच्या अंतिम लढतीची सर्व तिकिटे संपली आहेत. त्यामुळे रविवारची मेगा फायनल पीजेएन स्टेडियमवर प्रेक्षकांच्या उपस्थितीत रंगेल. त्यामुळे अंतिम फेरीची उत्सुकता वाढली आहे. अंतिम फेरीत खेळण्याचा मोठा आनंद आहे. जवळपास पाच महिने बायो-बबलमध्ये खेळणे सोपे नव्हते. मात्र, चांगले खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमुळे आम्ही मानसिक आणि शारीरीक तंदुरुस्ती राखण्यात यश मिळवले. प्रत्येकाने खूप मेहनत घेतली. त्यातच सांघिक कामगिरीत सातत्य राखल्याने सर्वकाही मनासारखे घडले, असे हैदराबाद एफसीचे मुख्य प्रशिक्षक मोनोलो मार्केझ यांनी अंतिम फेरीच्या पूर्वसंध्येला सांगितले.

अंतिम फेरीसह प्रतिस्पर्धी केरला ब्लास्टर्सबद्दल बोलताना, मागील हंगामात आम्ही उपांत्य फेरी गाठण्यात थोडक्यात अपयशी ठरलो. यावेळी थेट दुसरा क्रमांक मिळवला. अंतिम फेरीसह आयएसएल चषक उंचावण्याचे आमचे लक्ष्य आहे. मात्र, प्रतिस्पर्धी संघ कडवा आहे. नवा दिवस, नवा सामना असल्याने काहीही घडू शकते, असे मार्केझ म्हणाले. मार्केझ यांच्या प्रशिक्षकपदाखालील गत हंगामात हैदराबादने पाचवा क्रमांक मिळवला.

यंदाच्या उपांत्य फेरीत हैदराबादने एटीके मोहन बागानवर ३-२ अशी मात केली. दुसऱ्या लेगमध्ये ०-१ असा पराभव पाहावा लागला तरी पहिल्या लेगमधील मोठ्या विजयाने (३-१) तारले. हैदराबादच्या संस्मरणीय कामगिरीत बार्थोलोमेव ऑग्बेचे याचा मोठा वाटा राहिला आहे. त्याने यंदा १९ सामन्यांत १८ गोल करताना आयएसएलमधील एकूण गोलसंख्या ५३वर नेली आहे.

साखळीतील गुणतालिकेत चौथे स्थान मिळवणाऱ्या केरला ब्लास्टर्सने लीग शील्ड विजेत्या जमशेदपूर एफसीला बाहेरचा रस्ता दाखवला. अव्वल संघावरील विजय आणि फायनलमध्ये खेळण्याचा सर्वाधिक अनुभव पाहता त्यांचे पारडे जड आहे. मात्र, त्यांना गाफील राहून चालणार नाही. यंदाच्या हंगामात आम्ही पूर्ण क्षमतेसह खेळलो. त्याचे क्रेडिट प्रत्येक खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि चाहत्यांना जाते. अंतिम फेरीत खेळताना त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू, असा विश्वास केरलाचे मुख्य प्रशिक्षक इव्हान वुकोमॅनोविक यांनी व्यक्त केला आहे.

केरला ब्लास्टर्सची भिस्त अड्रियन लुनासह अल्वॅरो वॅझ्केझ, मार्को लेस्कोविक आणि जॉर्ज डियाझ या चौकडीवर आहे. लुना याने वैयक्तिक सहा गोल करताना संघाच्या १३ गोलांमध्ये सहभाग दर्शवला आहे. केवळ ऑग्बेचे यानेच लुनापेक्षा जास्त गोल असिस्ट केलेत.

हैदराबाद आणि केरला ब्लास्टर्स आजवर सहा वेळा आमनेसामने आलेत. त्यात प्रत्येकाने तीनदा बाजी मारली. त्यामुळे संडेस्पेशल महाअंतिम लढत जिंकून वर्चस्व राखण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करतील.

महत्त्वाच्या बातम्या-

हैदराबाद एफसीची ऐतिहासिक कामगिरी, प्रथमच मारली फायनलमध्ये धडक

केरला ब्लास्टर्स तिसऱ्यांदा फायनलमध्ये; लीग शील्ड विजेत्या जमशेदपूरचे पॅकअप

एटीके मोहन बागानला सर करावा लागेल अपेक्षांचा एव्हरेस्ट; हैदराबादविरुद्ध कसोटी!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---