गोवा| सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) बुधवारी वास्को येथील टिळक मैदानावर हैदराबाद एफसी आणि एफसी गोवा आमनेसामने येतील.
हैदराबादसाठी आतापर्यंतची मोहिम संमिश्र ठरली आहे. मॅन्युएल मार्क्वेझ यांचा संघ पाच सामने झाल्यानंतर अपराजित होता. त्यानंतर मात्र सलग दोन सामने गमवावे लागल्यामुळे त्यांची गुणतक्त्यात आठव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. अशावेळी गोव्याच्या रुपाने त्यांच्यासमोर कडवे आव्हान असेल, मात्र गोव्याच्या बचावातील समस्यांमुळे हैदराबादला मोहिमेची गाडी रुळावर आणण्याची आशा असेल.
गोवा सहाव्या क्रमांकावर आहे. यंदाच्या मोसमात सर्वाधिक धोकादायक आक्रमण करणारा संघ असा लौकीक त्यांनी निर्माण केला आहे. त्यांनी आतापर्यंत दहा गोल केले आहेत, पण बचावाच्या पातळीवर कडेकोट खेळ करणे त्यांच्यासाठी अवघड ठरले आहे. त्यांना नऊ गोल पत्करावे लागले असून केवळ एक क्लीन शीट राखता आली आहे. त्यांच्याविरुद्ध सात गोल सेट-पिसेसवर झाले असून सहभागी संघांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे.
गोव्याला बचावात झगडावे लागत असल्याची मार्क्वेझ यांना कल्पना आहे. त्यामुळे आपल्या संघाला जिंकण्याची संधी असेल हे सुद्धा त्यांना ठाऊक आहे. यंदा हैदराबादचा संघ अनेक वेळा संधी दवडण्याबद्दल दोषी ठरला. यावेळी नेटसमोर सफाईदार खेळ होण्याच्यादृष्टीने त्यांना खबरदारी घ्यावी लागेल.
प्रतिस्पर्धी संघाबद्दल मार्क्वेझ यांनी सांगितले की, गोल पत्करावा लागण्यासारख्या गोष्टी फुटबॉलमध्ये नेहमीच्या असतात. तुम्ही आक्रमक खेळ करीत असाल तर तुमच्या बचावात समस्या असतात आणि हेच दोन्ही संदर्भ बदलले तरी लागू होते. गोव्याची शैली आक्रमक आहे. याचे कारण ते आक्रमण करतात तेव्हा बऱ्याच खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्याच्या क्षेत्रात मुसंडी मारलेली असते. त्यांच्याकडे फार चांगले खेळाडू आहेत आणि हे प्रत्येकालाच माहित आहे. त्यांचा संघ म्हणजे केवळ इगोर अँग्युलो नसून मध्य आणि आघाडी फळीतील खेळाडूंनी छाप पाडली आहे. काही वेळा त्यांच्या बचावाच्या बाबतीत असे घडते की प्रतिस्पर्धी संघ प्रतिआक्रमण रचतो तेव्हा त्यांच्याकडे बचावपटू कमी उरलेले असतात आणि अशावेळी बचाव करणे फार अवघड ठरते.
हैदराबादला फक्त सहा गोल करता आले आहे. यापेक्षा कमी गोल केवळ केरला ब्लास्टर्स आणि एससी ईस्ट बंगाल यांचेच आहेत. यानंतरही सेट-पिसेसवर आपला संघ धोकादायक ठरू शकतो हे हैदराबादने दाखवून दिले आहे. निम्मे गोल त्यांनी या पद्धतीने केले आहेत.
अशावेळी गोव्यासमोर कडवे आव्हान असेल, पण प्रशिक्षक जुआन फरांडो यांनी क्लीन शीट कमी असूनही आपल्या संघाकडून बचावात्मक स्थितीसाठी तयारी करून घेण्यावर जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांनी सांगितले की, पहिली गोष्ट अशी की, आम्ही तीन गोल पत्करले आणि चार केले तर मला काळजी वाटणार नाही. सेट-पिसेसच्या बाबतीत आम्हाला येणाऱ्या अपयशामागील कारणे जाणून घ्यावी लागतील. यात समन्वय महत्त्वाचा असतो. बचाव फळीवर मेहनत घेताना चेंडूवर आक्रमण करण्याचे टायमिंग समजून घेणे महत्त्वाचे असते. मोकळ्या जागी कोण सरस ठरेल, विविध क्षेत्रांत कुणावर कामगिरी सोपवावी, खेळाडूगणिक मार्किंग कसे करायचे हे सुद्धा महत्त्वाचे असते. या बाबतीत आम्हाला थोडा वेळ लागेल, कारण सामन्यागणिक प्रतिस्पर्ध्याच्या शैलीनुसार खेळाडू बदलणे गरजेचे असते.