कोलकाता । भारतीय क्रिकेट संघाचा नियमित कसोटी यष्टीरक्षक वृद्दीमान सहाने २०१९चा विश्वचषक खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी तो मोठ्या प्रमाणावर कष्टही घेत आहे असेही तो म्हणाला.
सहा म्हणतो, ” माझ्या पत्नीला मी विश्वचषक २०१९ चा भाग असावे असे मनापासून वाटते. त्यामुळे ती मला सतत कठोर मेहनत घ्यायला सांगते. मी माझ्या परीने रोज अथक परिश्रम करतो. परंतु याचा निर्णय पूर्णपणे निवड समिती घेईल. ”
वृद्धिमान सहाने आजपर्यंत भारताकडून २८ कसोटी सामने खेळले आहेत. वृद्धिमान सहा कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत असून एमएस धोनी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे.
२०१० मध्ये सहाने आपला पहिला वनडे सामना खेळला होता. त्यानंतर आजपर्यंत ७ वर्षात तो केवळ ९ सामने खेळला आहे. त्याने २०१४ साली श्रीलंका संघाविरुद्ध आपला शेवटचा वनडे सामना हैद्राबाद येथे खेळला आहे.
“प्रत्येक खेळाडूला सर्वच प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळायला आवडते. परंतु ते सर्वकाही निवड समितीवर अवलंबून असते. चांगली कामगिरी करणे हे माझे कर्तव्य आहे. बाकी सर्व निवड समितीवर अवलंबून आहे. ” सहा पुढे म्हणाला.