मुंबई । भारतीय एकदिवसीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स किंवा भारतीय संघाकडून खेळत असताना त्याची पत्नी रितिका त्याला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियमवर नेहमीच हजर असते. रोहित विरोधी संघातल्या गोलंदाजांना नेस्तनाभूत करत गगनभेदी खेळी करतो तेव्हा रितिका टाळ्या वाजवून आनंदही व्यक्त करते. पण एक वेळ अशी आली होते की, रोहित त्याच्या तिसऱ्या एकदिवसीय द्विशतकाच्या समीप पोहोचला होता तेव्हा रितिका स्टेडियममध्ये बसून ढसाढसा रडली होती.
बीसीसीआयच्या टीव्ही चॅनलवरील ‘ओपन नेट्स विथ मयंक’ या मालिकेतील दुसऱ्या भागात रोहित शर्मा आणि शिखर धवन सामील झाले होते. या कार्यक्रमाचे निवेदन मयंक अग्रवाल करत होता. कार्यक्रमात त्याने मयंकशी बोलताना रितिका का रडत होती, याचा खुलासा केला. रोहितने 2017 साली श्रीलंकेविरुद्ध विक्रमी तिसरे एकदिवसीय द्विशतक ठोकले होते.
रोहित म्हणाला की, “मी 196 धावांवर खेळत असताना ड्राइव्ह शॉट मारला. स्टेडियममध्ये बसलेल्या रितिकाला वाटले की, माझा हात मोडला गेला, म्हणून ती खूप भावूक होत चिंतेत पडली आणि रडायला सुरुवात केली.”
रोहितने या सामन्यात डोळ्याचे पारणे फेडणारे फटके मारत नाबाद 208 धावांची विक्रमी खेळी केली होती. त्याच्या या द्विशतकाच्या जोरावर भारताने 392 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात, श्रीलंका संघ 50 षटकात 8 बाद 251 धावा करू शकला. रोहितने त्याच्या कारकिर्दीत एकूण तीन द्विशतके ठोकली. यातील दोन द्विशतके श्रीलंकेविरोधात तर एक द्विशतक ऑस्ट्रेलियाविरुद्ध केले आहे.