fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

करियरमधील पहिल्याच वनडे सामन्यात हॅट्रिक विकेट्स घेणारे ३ गोलंदाज

4 Debutante took Hat Trick in International Cricket

सर्वांनाच माहिती आहे, की क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात नेहमीच विक्रम फलंदाजांच्या नावावर असतात किंवा फलंदाजांच्या विक्रमाचीच जास्त चर्चा होते.

परंतु गोलंदाजांचे असे काही विक्रम असतात, जे चाहत्यांना लक्षात ठेवायला आवडतात. त्या विक्रमांपैकी एक विक्रम आहे, गोलंदाजांनी घेतलेली हॅट्रिक.

आंतरराष्ट्रीय स्तरावर सामन्यात हॅट्रिक घेणे प्रत्येक गोलंदाजाचे स्वप्न असते. परंतु असे खूपच कमी गोलंदाज आहेत, जे आपल्या कारकीर्दीत ही कामगिरी करतात. हॅट्रिकला गोलंदाजाच्या सर्वोत्तम कामगिरीमध्ये गणले जाते.

परंतु जर एखाद्या गोलंदाजाने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात हॅट्रिक घेतली, तर त्यापेक्षा अधिक चांगला पदार्पणाचा सामना दुसरा कोणताच असूच शकत नाही. एकवेळ पदार्पणाच्या सामन्यात शतकी खेळी करणं सोप्पं, पण हॅट्रिक विकेट घेणं महाकठीण.

तर आज या लेखात आपण अशा ४ गोलंदाजांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच हॅट्रिक घेण्याचा कारनामा करून दाखविला आहे.

पदार्पणाच्या वनडे सामन्यात हॅट्रिक विकेट्स घेणारे ४ खेळाडू- 4 Debutante took Hat Trick in International Cricket

१. तैजुल इस्लाम

बांगलादेशचा फिरकीपटू गोलंदाज तैजुल इस्लाम (Taijul Islam) आपल्या वनडे पदार्पणाच्या सामन्यात हॅट्रिक विकेट्स घेणारा जगातील पहिलाच गोलंदाज आहे. तैजुलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १ डिसेंबर, २०१४ साली झिंबाब्वेविरुद्धच्या सामन्यातून वनडेत पदार्पण केले होते. त्या सामन्यात त्याने ७, ८ आणि ९व्या क्रमांकावरील फलंदाजांना बाद करत हॅट्रिक घेतली होती. त्यात तिनाशे पान्यांगारा, जॉन न्यूम्बू आणि तेंडई चटारा या फलंदाजांचा समावेश होता.

त्या सामन्यात तैजुलने ७ षटकात ११ धावा देत ४ विकेट्स चटकावल्या होत्या. त्या सामन्यात बांगलादेशने ५ विकेट्सने विजय मिळविला होता. तसेच शेवटी सामनावीर पुरस्काराने त्याला सन्मानितही करण्यात आले होते.

२. कागिसो रबाडा

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा (Kagiso Rabada) जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. त्याला सध्याच्या काळात टॉप ५ गोलंंदाजांपैकी एक मानले जाते. रबाडाने आपल्या पदार्पणाच्या वनडे सामन्यात हॅट्रिक विकेट्स घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले होते. त्याने १० जुलै २०१५साली ढाका येथे बांगलादेशविरुद्ध खेळताना वनडेत पदार्पण केले होते.

रबाडाने त्या सामन्याच्या चौथ्या षटकाच्या शेवटच्या ३ चेंडूत बांगलादेशच्या ३ फलंदाजांना पव्हेलियनमध्ये पाठवत आपली हॅट्रिक पूर्ण केली होती. त्याने तमीम इकबाल, लिटन दास आणि महमुदूल्लाह या फलंदाजांना बाद केले होते. त्या सामन्यात रबाडाने ८ षटके टाकताना १६ धावा देत ६ विकेट्स घेतल्या होत्या. पदार्पणाच्या सामन्यातील ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

३. वानिंदु हसरंगा

वानिंदु हसरंगा (Wanindu Hasaranga) आपल्या पदार्पणाच्या वनडे सामन्यात हॅट्रिक विकेट्स घेणारा श्रीलंकेचा पहिला आणि जगातील तिसरा गोलंदाज आहे. हसरंगाने २ जुलै २०१७मध्ये झिंबाब्वेविरुद्धच्या सामन्यातून वनडेत पदार्पण केले होते. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने उत्कृष्ट कामगिरी करत हॅट्रिक घेतली होती.

हसरंगाने आपल्या तिसऱ्या षटकात ही कामगिरी केली होती. ज्यामध्ये त्याने माल्कम वॉलर, डोनाल्ड तिरिपानो आणि टेंडई चटारा या फलंदाजांना बाद करत झिंबाब्वेचा डाव संपवला होता. त्या सामन्यात झिंबाब्वे संघ १५५ धावांवर संपुष्टात आला होता आणि या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेने १५८ धावा करत तो सामना ७ विकेट्सने जिंकला होता.

४. शहन मधुशंका

शहन मधुशंका (Shehan Madushanka) हा पदार्पणाच्या वनडे सामन्यात हॅट्रिक विकेट्स घेणारा श्रीलंकेचा दुसरा आणि जगातील चौथा गोलंदाज आहे. मधुशंकाला २७ जानेवारी २०१८ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या वनडे सामन्यातून पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. मधुशंकाने सामन्याच्या ३९व्या षटकाच्या शेवटच्या २ चेंडूत महमुदूल्लाह आणि मश्रफे मोर्जझाला बाद केले आणि त्यानंतर ४१ व्या षटकात गोलंदाजी करताना पहिल्याच चेंडूत रुबेल हुसेनला बाद केले होते. अशाप्रकारे त्याने हॅट्रिक विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्या सामन्यात मधुशंकाने ६.१ षटकात २६ धावा देत ३ विकेट्स घेतल्या होत्या.

त्या सामन्यात श्रीलंकेने  सर्वबाद २२१ धावा केल्या होत्या. श्रीलंकेच्या २२२ धावांचा पाठलाग करताना बांगलादेश संघाला सर्वबाद १४२ धावाच करता आल्या होत्या. अशाप्रकारे तो सामना श्रीलंकेने ७९ धावांनी जिंकला होता.

वाचनीय लेख-

-सर्वाधिक वेळा वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणारे ५ संघ

-वनडे कर्णधार असताना समोरच्या संघाला जबरदस्त धुणारे ५ क्रिकेटर, ३ आहेत भारतीय

-वनडे सिरीजमध्ये षटकारांचा पाऊस पाडणारे ५ खेळाडू, चौथे नाव आहे खास

You might also like