दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (SA vs IND) यांच्यात रविवारपासून (२६ डिसेंबर) पहिल्या कसोटी सामन्याची सुरुवात होणार आहे. बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Test) म्हणून ओळखला जाणारा हा सामना सेंच्यूरियन येथे दुपारी १.३० वाजेपासून सुरू होणार आहे. या सामन्यात भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याच्यावर सर्वांचे लक्ष असणार आहे. खराब फॉर्ममध्ये असलेल्या या खेळाडूसाठी ही कसोटी मालिका अग्निपरिक्षेपेक्षा कमी नसेल. तत्पूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी रहाणेविषयी मोठी प्रतिक्रिया (Rahul Dravid On Ajinkya Rahane) दिली आहे.
रहाणे जरी भारताच्या कसोटी संघातील अनुभवी खेळाडू असला तरीही त्याच्यासोबत कठिण आणि स्पष्ट बोलणे झाले आहे. जर तो या मालिकेतून पुन्हा जुन्या रंगात परतला नाही; तर त्याला पुढे संधी मिळणे जवळजवळ अशक्य होईल असे द्रविड यांनी म्हटले आहे.
कारण मागील न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत रहाणेच्या जागी श्रेयस अय्यरला संधी दिली गेली होती आणि त्याने संधीचे सोने करत आपली प्रतिभाही दाखवली होती. पुढे श्रेयसमुळे रहाणेला मुंबई कसोटीतून वगळण्यात आले होते. तसेच दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीही त्याच्याकडून उपकर्णधारपद काढून घेण्यात आले आहे.
बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी द्रविड यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आले की, ईशांत शर्मा आणि अजिंक्य रहाणेसारख्या वरिष्ठ खेळाडूंसोबत तुमचे काय बोलणे झाले आहे, ज्यांना पहिल्या कसोटीतून बाहेर ठेवले जाण्याची शक्यता आहे. यावर द्रविड म्हणाले की, “जर संघात निवड न झाल्याने खेळाडू नाराज होत असतील, ही चांगली गोष्ट आहे. कारण त्यांना संघात जागा मिळण्यामागचे महत्त्व माहिती असते. त्यांना आपल्या संघातील स्थानाची आणि क्रिकेट खेळण्याची चिंता असते. भारताच्या कसोटी संघात अधिकतर अनुभवी खेळाडू आहेत. पण काहीवेळा खेळाडूंशी कठिण संवाद साधावे लागतात. तू आज खेळणार नाहीस, असे त्यांना सांगणे खूप कठिण असते. कारण प्रत्येकाला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळायचे असते.”
हेही वाचा- पुजारा-रहाणेला जुन्या रंगात आणण्यासाठी महागुरूने घेतली धोनीच्या ‘शागीर्द’ची मदत, व्हिडिओ व्हायरल
पुढे बोलतामा द्रविड म्हणाले की, “वरिष्ठ खेळाडू अशा परिस्थितींना समजून घेऊ शकतात. कारण तेसुद्धा अशा स्थितीतून गेलेले असतात. काही तर आपल्या प्रादेशिक संघांचे वरिष्ठ खेळाडू राहिलेले असतात, तसेच काही नेतृत्व दलाचाही भाग राहिलेले असतात. त्यामुळे त्यांनाही असे निर्णय घ्यावे लागतात.”
प्लेइंग इलेव्हनच्या निवडीविषयी बोलताना द्रविड म्हणाले, “आमच्याकडे एकाहून एक शानदार खेळाडू आहेत. पण आम्हाला योग्य तो निर्णय घ्यावा लागतोच. कारण कितीही झाले तरी प्रत्यक्षात ११ खेळाडूच खेळू शकतात. आम्ही भावनांमध्ये वाहून निर्णय घेऊ शकत नाही. दक्षिण आफ्रिकाविरुद्धची कसोटी मालिका जिंकण्यासाठी आमच्या ताफ्यात चांगल्या चर्चा झाल्या आहेत. आम्ही प्रतिस्पर्धींविरुद्ध आमची सर्वोत्कृष्ट अंतिम एकादश उतरवू.”
महत्त्वाच्या बातम्या-
एकीचे बळ! जेव्हा हरभजनवर आलेली बंदी, तेव्हा भारतीय संघाने दाखवलेला खंबीर पाठींबा, वाचा तो किस्सा
हार्दिक पंड्या पुन्हा बनणार बाप? पत्नी नताशाच्या ‘या’ फोटोंनी चर्चांना उधाण