मुंबई। इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामाला शुक्रवारपासून (९ एप्रिल) सुरुवात होत आहे. त्यामुळे आता सर्वत्र आयपीएलची चर्चा रंगली आहे. त्यातच आयपीएल म्हटलं की ३ वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्स आणि या संघाचा कर्णधार एमएस धोनीचीही चर्चा मोठ्या प्रमाणात होत असते. आयपीएलच्या पहिल्या हंगामापासूनच चेन्नई आणि धोनीचे नाते जोडले गेले असून ते नाते अजूनही अबाधित आहे.
मात्र, सध्या आगामी आयपीएल हंगामत धोनीचा कारकिर्दीत शेवटचा हंगाम असावा, अशी चर्चा रंगली आहे. पण याबद्दल आता चेन्नईचे सीईओ यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
चेन्नई सुपर किंग्सचे सीईओ कासी विश्वनाथन यांना इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा विचारण्यात आले की धोनीचा हा शेवटचा हंगाम आहे का, तेव्हा त्यांनी शेवटचा हंगाम असल्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले.
ते म्हणाला, ‘हे पाहा, मला वाटत नाही की हा त्याचा शेवटचा हंगाम आहे. हे माझे वैयक्तिक मत आहे आणि मला वाटत नाही की आम्ही कोणाचा (उत्तराधिकारी) शोध घेत आहोत.’
या कारणामुळे होत आहे धोनीच्या आयपीएलमधून निवृत्तीची चर्चा
खरंतर धोनी आणि निवृत्ती ही चर्चा गेल्या २ वर्षांपासून क्रिकेटवर्तुळात सुरुच आहे. त्यातच यंदा चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या जर्सीत काही बदल केले. नवी जर्सी नेहमीप्रमाणे पिवळ्या रंगाचीच असली तरी खांद्याला केमोफ्लाजचे डिजाईन आहे. त्यातच धोनीला आर्मीबद्दल अतोनात प्रेम आहे, हे अनेकदा दिसून आले आहे. त्याला लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी देखील मिळाली आहे.
त्याचमुळे चेन्नईच्या जर्सीमध्ये केमोफ्जाजचे डिजाईन पाहून अनेकांनी असा कयास लावायला सुरुवात केली की हा धोनीचा शेवटचा हंगाम असून त्याला मानवंदना म्हणून जर्सीमध्ये असा बदल केला आहे.
धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
धोनी सध्या जरी आयपीएल खेळत असला तरी तो मागीलवर्षी १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीची घोषणा केली होती. असे असले तरी त्याने आयपीएलमध्ये मात्र खेळत राहाणे पसंत केले होते. त्याचमुळे तो अजूनही आयपीएल खेळत आहे.
धोनीची आयपीएलमधील कामगिरी
धोनीने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये २०४ सामने खेळले असून ४०.९९ च्या सरासरीने ४६३२ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने २३ अर्धशतके केली आहेत. तसेच आयपीएलमध्ये यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेणारा तो यष्टीरक्षक आहे. त्याने आयपीएलमध्ये १९७ सामन्यात यष्टीरक्षण केले असून यष्टीमागे १४८ विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याच्या १०९ झेलांचा आणि ३९ यष्टीचीतचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबई विरुद्ध बेंगलोर सामन्याने होणार आयपीएल २०२१ ची सुरुवात, पाहा संपूर्ण वेळापत्रक
यंदा आरसीबीला मिळणार का विजेतेपद? चाहत्याच्या प्रश्नाला मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचे भन्नाट उत्तर
धोनी मैदानात ‘कॅप्टनकुल’ तर मैदानाबाहेर करणार ‘हेरगिरी’; वाचा काय आहे प्रकरण