भारतात सध्या चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरु आहे. चौथ्या टप्प्यातील या लॉकडाऊनमध्ये आवश्यक परवानग्या घेतल्यानंतर आणि कठोर मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि स्टेडियममध्ये वैयक्तिक प्रशिक्षण घेण्यासाठी खेळाडूंना परवानगी देण्यात आली आहे.
पण तरीही महाराष्ट्र शासनाने मुंबई-पुणे सारख्या रेड झोनमधील क्षेत्रात सरावासाठी अजून परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मुंबईत सध्या रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर असे काही खेळाडू आहेत, त्यांनाही अजून सरावाची परवानगी मिळालेली नाही.
अशा वेळी रोहितने ला लीगाच्या फेसबुक पेजवर बोलताना म्हटले आहे की कदाचीत जेव्हा भारतीय संघातील खेळाडू सरावाला सुरुवात करतील तेव्हा त्यांच्यात तो सर्वात शेवटी सामील होऊ शकतो.
रोहित म्हणाला, ‘मला माझ्या संघसहकाऱ्यांची आठवण येत आहे. त्यांच्याबरोबर फिरणे, मस्ती करणे मी मिस करत आहे. पण आम्ही मित्र म्हणून व्हिडिओ कॉलद्वारे संपर्कात राहण्याचा प्रयत्न करीत आहोत.’
‘जेव्हा तूम्ही वर्षातील ३६५ दिवसांपैकी ३०० दिवस एकत्र खेळत असता, एकत्र प्रवास करत असता, तेव्हा तूमच्यासाठी ते एका कुटुंबासारखे असतात. त्यामुळे जेवढे लवकर शक्य होईल तेवढे मला पहिल्यांदा त्या सर्वांना भेटायला आवडेल आणि थोडे चेंडूला हिट करायला आवडेल.’
तसेच सध्या देशात सर्वाधिक कोरोना व्हायरसचा फटका बसलेल्या मुंबई शहरात राहत असल्याने त्याला कदाचीत बाकी खेळाडूंपेक्षा सराव करण्यासाठी अधिक वाट पहावी लागेल, असेही रोहित म्हणाला.
रोहित म्हणाला, ‘मला वाटते मी जिथे राहतो ते मुंबई शहर सर्वाधिक संसर्गित आहे, त्यामुळे कदाचीत मुंबईपेक्षा अन्य ठिकाणे लवकर चालू होतील. मला वाटते की अन्य सर्वजण मला ते माझ्याआधी एकमेकांना भेटल्याचे व्हिडिओ पाठवतील.’
तसेच रोहितने असेही म्हटले आहे की सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर तो त्याच्या डाएटवर लक्ष देत आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
…म्हणून टीम इंडियाच्या या खेळाडूवर बीसीसीआयने व्यक्त केली नाराजी
व्हिडिओ: २१ वर्षांपूर्वी सचिनने केलेल्या ‘त्या’ शतकाने सर्वांना केले होते भावनिक