पॅट कमिन्स केकेआर संघाच्या सर्व स्टाफला डिनर पार्टी देणार आहे. आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या कमिन्सला २०२०च्या हंगामासाठी केकेआरने तब्बल १५.५ कोटी रुपये मोजत संघात घेतले आहे.
२०१४मध्ये हा खेळाडू केकेआर संघाचा भाग राहिला आहे. तेव्हा केकेआरने विजेतेपदावर नाव कोरले होते.
यावेळी मोठी किंमत मिळूनही आयपीएल होणार नसल्याने कमिंस थोडा नाराज आहे. परंतु आपल्याला लिलावात एवढे पैसे मोजल्याने त्याने केकेआरचे आभारही मानले आहे.
शुक्रवारी २७वर्षांचा झालेला हा खेळाडू केकेआरच्या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणतो, मी ब्रेंडन मॅक्क्युलम व सर्व स्टाफचा आभारी आहे, ज्यांनी मला केकेआरमध्ये सहभागी करुन घेतले. त्यामुळे मी त्यांना डिनरला घेऊन जाणार आहे. खासकरुन मी ब्रेंडनला तर घेऊन जाणारच आहे. तो एक चांगला क्रिकेटपटू व कर्णधार राहिला आहे. तसेच मी त्याविरुद्ध भरपुर क्रिकेटही खेळलं आहे.
आयपीएलमध्ये १६ सामन्यात कमिन्सने १७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची सरासरी २९.३५ची राहिली असून तो कोलकाता नाईट रायडर्स व मुंबई इंडियन्सचा भाग राहिला आहे.