4 जून रोजी बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमच्या बाहेर चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आणि 56 जण गंभीर जखमी झाले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल 2025 जिंकल्यानंतर ही घटना घडली. योग्य व्यवस्थापन न झाल्यामुळे परिस्थिती बिघडली. विराट कोहलीने आता बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावरची शांतता भंग केली आणि दु:खी मनाने पीडितांच्या कुटुंबांना संदेश पाठवला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अलीकडेच जाहीर केले होते की ते आरसीबी केअर नावाच्या फाउंडेशनची सुरुवात करत आहेत आणि ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबांना मदत करतील. आरसीबीच्या अधिकृत वेबसाइटवर त्यानंतर विराटचे निवेदनही प्रसिद्ध झाले. यात त्यांनी म्हटले आहे, ‘४ जूनला जे हृदय पिळवटून टाकणारे अपघात झाले त्यासाठी कोणीही तयार नव्हते. आमच्या फ्रँचायझीचा जो सर्वात आनंदाचा क्षण होता, तो एका दुःखद घटनेत बदलला. ज्यांनी आपले जवळचे गमावले किंवा जखमी झाले, त्या सर्व कुटुंबांविषयी मी विचार करतो आहे आणि त्यांच्या साठी प्रार्थना करतो आहे. तुमची हानी आता आमच्या कथेतला एक भाग आहे. आपण सगळे मिळून आता काळजी, सन्मान आणि जबाबदारीसह पुढे जाऊ.’
आरसीबी आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने अचानक चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सेलिब्रेशन करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र गोष्टी योग्य प्रकारे नियोजित झाल्या नव्हत्या आणि पुरेशी पोलिस यंत्रणा देखील तैनात नव्हती. याशिवाय, आरसीबीच्या आयपीएल विजयानिमित्त अपेक्षेपेक्षा जास्त लोक जमले. त्यामुळेच स्टेडियमच्या बाहेर चेंगराचेंगरी झाली आणि 11 जणांना आपले प्राण गमवावे लागले. कर्नाटक हायकोर्टाने यासाठी आरसीबी, कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला जबाबदार ठरवले.






