भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचे (Yuvraj Singh) वडील योगराज सिंग (Yograj Singh) यांनी पुन्हा एकदा एमएस धोनीवर (MS Dhoni) निशाणा साधला आहे. त्याने भारताचा माजी कर्णधार धोनीवर गंभीर आरोप केले आहेत. ‘कॅप्टन कूल’ने युवराजची कारकीर्द उद्ध्वस्त केली, असा गंभीर आरोप योगराज सिंग यांनी केला आहे. युवराज आणखी चार-पाच वर्षे देशासाठी खेळू शकला असता, असा दावा त्यांनी केला आहे. योगराज यांनी आपल्या मुलाला ‘भारतरत्न’ देण्याची मागणीही केली आहे. युवराज 2007 टी20 विश्वचषक आणि वनडे विश्वचषक 2011 जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता.
‘मी धोनीला माफ करणार नाही’
‘झी स्विच’वरील संभाषणादरम्यान योगराज म्हणाले, “मी एमएस धोनीला माफ करणार नाही. त्याने आरशात आपला चेहरा पाहावा. तो एक महान क्रिकेटर आहे पण त्याने माझ्या मुलाविरुद्ध जे काही केले ते आता समोर येत आहे. मी त्याला कधीही माफ करू शकत नाही. प्रथम, ज्यांनी माझ्यावर अन्याय केला त्यांना मी कधीच माफ केले नाही, जरी ते माझे कुटुंब असले तरीही.”
‘माझ्या मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त केले’
तो पुढे म्हणाला, “त्या माणसाने (धोनी) माझ्या मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. युवराज आणखी चार-पाच वर्षे क्रिकेट खेळू शकला असता. त्याच्याशी संबंधित असलेल्या लोकांना सलाम. युवराज सिंग आणि गौतम गंभीरसारखे खेळाडू म्हणतात की, युवराज सिंगसारखा खेळाडू पुढे कधीच जन्माला येणार नाही. असे मी नव्हे तर सगळे जग म्हणत आहे. युवराजला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले गेले पाहिजे. तो कँसरग्रस्त असतानाही त्याने देशाला विश्वचषक जिंकून दिला.”
दरम्यान 2011 विश्वचषकादरम्यान युवराज कँसरशी झुंज देत होता. या विश्वचषकात त्याने 1 शतक आणि 4 अर्धशतकांच्या जोरावर 362 धावा केल्या होत्या. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला मालिकावीर पुरस्कारानेही घोषित करण्यात आले होते.
हेही वाचा –
इंग्लंडमध्ये रहाणेचे खणखणीत शतक, बांगलादेश मालिकेपूर्वी ठोठावलं टीम इंडियाचं दार!
दोन वर्षांनंतर कसोटी शतक! बांगलादेशच्या या फलंदाजानं पाकिस्तानला धो-धो धुतलं
‘हिटमॅन’च्या निशाण्यावर वीरेंद्र सेहवागचा जबरदस्त रेकॉर्ड… बांगलादेश मालिकेत रचणार इतिहास!