मुबंई I वेस्ट इंडिजचे माजी वेगवान गोलंदाज आणि समालोचक इयान बिशप यांनी या दशकातील जागतिक एकदिवसीय संघ निवडला आहे. या ११ खेळाडूंपैकी ३ भारतीय खेळाडूंचा संघात समावेश आहे. विशेष म्हणजे या संघाच्या नेतृत्वाची धुरा त्यांनी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्याकडे सोपविली आहे.
बिशप यांनी रोहित शर्मा, विराट कोहली आणि महेंद्र सिंग धोनी यांना संघात स्थान दिले आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे या जागतिक एकदिवसीय संघात एकाही भारतीय गोलंदाजाला स्थान दिले नाही. सलामीची जबाबदारी त्यांनी रोहित शर्मा आणि आँस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज डेव्हिड वाँर्नर यांच्यावर सोपविली आहे.
तिसऱ्या क्रमांकासाठी भारतीय कर्णधार विराट कोहलीला स्थान दिले आहे. चौथ्या क्रमाकांसाठी ३६० या नावाने प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज एबी डिविलिर्यस याला निवडले आहे.
विशेष बाब म्हणजे बिशप यांनी स्टीव स्मिथ आणि केन विलियमन्स यांना संघात स्थान दिले नाही. पाचव्या स्थानासाठी कीवी फलंदाज राँस टेलर आणि अष्टपैलू म्हणून बांग्लादेशचा दिग्गज खेळाडू शाकिब अल हसन याला निवडले आहे. महेंद्रसिंग धोनी याच्यावर यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवली आहे.
वेगवान गोलंदाजीची जबाबदारी आँस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्क, दक्षिण आफ्रिका डेल स्टेन, श्रीलंकेचा लसिथ मलिंगा यांच्यावर सोपविली आहे. फिरकी गोलंदाज म्हणून अफगाणिस्तानचा युवा खेळाडू लेगस्पिनर राशिद खान याला संघात स्थान दिले आहे. बिशप यांनी निवडलेल्या संघात एकही पाकिस्तानी खेळाडू नाही.
इयान बिशप यांनी निवडलेला दशकातील एकदिवसीय संघ
रोहित शर्मा, डेविड वॉर्नर, विराट कोहली, एबी डिविलियर्स, रोस टेलर, शाकिब अल हसन, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), मिशेल स्टार्क, डेल स्टेन, लसिथ मलिंगा, राशिद खान