आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वकालीन महान अष्टपैलू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंग्लंडच्या सर इयान बॉथम यांच्यासाठी तसेच क्रिकेटविश्वासाठी २१ ऑगस्ट ही तारीख नेहमी खास राहिली आहे. अनेक विक्रम आपल्या नावे असलेल्या सर बॉथम यांनी या दिवशी एका वादग्रस्त घटनेनंतर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत नव्या विक्रमाला गवसणी घातली होती.
त्या घटनेमुळे झाले होते निलंबन
आपल्या काळातील सर्वोत्तम अष्टपैलू असलेल्या बॉथम यांच्यावर १९८६ मध्ये गांजा पिल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. हा आरोप बॉथम यांनी कबूल केला. त्यानंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) बॉथम यांच्यावर दोन महिन्यांच्या निलंबनाची कारवाई केली. ही बंदी जून १९८६ ते ऑगस्ट १९८६ या कालावधीत होती.
बॉथम यांचे अविस्मरणीय पुनरागमन
निलंबन पूर्ण झाल्यानंतर बॉथम यांनी २१ ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवले. ओव्हल येथील हा सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळला जात होता. बॉथम यांनी मैदानावर ज्याप्रकारे पुनरागमन केले ते चित्रपटापेक्षा कमी नव्हते. बॉथम यांनी आपल्या पहिल्याच चेंडूवर ब्रूस एडगरला बाद केले आणि नंतरच्याच षटकात जेफ क्रो यांचा बळी मिळविला. या दोन बळींसह ते त्यावेळचे सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाजही बनले. एवढेच नाही तर बॉथम यांनी याच सामन्यात ३६ चेंडूत आक्रमक ५९ धावा केल्या. पावसामुळे सामना अनिर्णित राहिला असला तरी, बॉथम यांच्या या पुनरागमनाची चर्चा अजूनही केली जाते.
गावसकर यांचे खास मित्र
सर इयान बॉथम हे भारताचे सर्वकालीन महान सलामीवीर सुनील गावसकर यांचे खास मित्र मानले जातात. ते सॉमरसेटसाठी एकत्रितरित्या काउंटी क्रिकेट खेळत. या दोघांमधील एक मजेशीर किस्सा आवर्जून सांगितला जातो. गावसकर कुत्र्याला घाबरतात, हे बॉथम यांना माहीत होते. एक दिवस गावसकर हे टेलिफोन बूथमध्ये फोनवर बोलत असताना, बॉथम यांनी त्या बूथबाहेर एक कुत्रा बांधला. अखेर खूप विनवण्या केल्यानंतर त्यांनी तो कुत्रा सोडून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
विहारीने काय चूक केली? दिग्गजाने निवडसमितीवर ओढले ताशेरे
बीसीसीआय सुधारणार बिहार क्रिकेटची दशा; ‘या’ दोघांवर सोपवली जबाबदारी
गेल-ब्राव्हो पुन्हा दाखवणार आयपीएलमध्ये जलवा