आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसीने) महिलांची वनडे रँकिंग जाहीर केली आहे. या यादीत टॉप ५ मध्ये दोन भारतीय महिला क्रिकेटपटूंना स्थान मिळाले आहे. २०२१ चा सर्वश्रेष्ठ महिला वनडे क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावणाऱ्या स्म्रिती मंधानाचा टॉप ५ मध्ये समावेश झाला आहे. तर भारतीय संघाची कर्णधार मिताली राज दुसऱ्या स्थानी कायम आहे.
टॉप ५ मध्ये २ भारतीय फलंदाज
ही रँकिंग जाहीर करण्यापूर्वी स्म्रिती मंधाना सातव्या स्थानी होती. आता ती दोन पाऊल पुढे सरकत ७१० रेटिंग पॉईंट्ससह पाचव्या स्थानी पोहोचली आहे. तर मिताली राज ७३८ रेटिंग पॉईंट्ससह दुसऱ्या स्थानी कायम आहे. तसेच ऑस्ट्रेलियाची फलंदाज एलिसा हेली ७४२ रेटिंग पॉईंट्ससह पहिल्या स्थानी कायम आहे. तर ऑस्ट्रेलियाची फलंदाज बेथ मुनी ७१९ रेटिंग पॉइंट्ससह तिसऱ्या आणि एमी सेटरवेट ७१७ रेटिंग पॉइंट्ससह चौथ्या स्थानी आहे.
झुलन गोस्वामी दुसऱ्या स्थानी
गोलंदाजांच्या यादीत भारतीय वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी ७२७ रेटिंग पॉइंट्ससह दुसऱ्या स्थानी कायम आहे. तर ऑस्ट्रेलियाची गोलंदाज जेस जोनासेन ७७३ रेटिंग पॉइंट्ससह अव्वल स्थानी कायम आहे.
अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी मारली बाजी
अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत ऑस्ट्रेलिया संघातील दिग्गज खेळाडू एलिसा पेरी सर्वोच्च स्थानी कायम आहे. एलिसा पेरीने नुकताच इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या वनडे सामन्यात ४० धावांची खेळी केली होती. यासह गोलंदाजी करताना तिने ३ गडी देखील बाद केले होते. ज्यामुळे तिच्या रेटिंग पॉइंट्समध्ये ४७ गुणांची भर पडली.
एलिसा पेरीने इंग्लंडच्या नेट स्क्वेवरला मागे टाकत अव्वल स्थान गाठले आहे. तसेच अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत भारतीय खेळाडू दीप्ती शर्मा २९९ रेटिंग पॉइंट्ससह चौथ्या स्थानी आहे. तर झुलन गोस्वामी २५१ रेटिंग पॉइंट्ससह १० व्या स्थानी कायम आहे.
महत्वाच्या बातम्या :
केएल राहुल इन, ईशान आऊट तर कुलदीपच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह; अशी असू शकते प्लेइंग ११
चॅम्पियन बनणे सोपे नाही! विश्वचषक जिंकलेल्या १९ वर्षांखालील भारतीय संघाचा वाचा संघर्षगाथा