ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकाची समाप्ती रविवारी (13 नोव्हेंबर) होईल. मेलबर्न येथील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर इंग्लंड आणि पाकिस्तान हे संघ अंतिम सामन्यात समोरासमोर येतील. दोन्ही संघांकडे आपले दुसरे टी20 विश्वविजेतेपद जिंकण्याची संधी आहे. त्याचवेळी या अंतिम सामन्यासाठी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ऑफिशियल्सची घोषणा केली आहे. यामध्ये सामनाधिकारी व चार पंचांचा समावेश असेल.
मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा मान इंग्लंड व पाकिस्तानने मिळवला. इंग्लंडने उपांत्य सामन्यात भारताचा तर पाकिस्तानने न्यूझीलडचा पराभव केला. आता या अंतिम सामन्यासाठी ऑफिशियल्सची नावे जाहीर केली. या अति महत्त्वाच्या सामन्यासाठी सामनाधिकारी म्हणून श्रीलंकेचे रंजन मदुगले जबाबदारी सांभाळतील. या अंतिम सामन्यात मैदानी पंच म्हणून श्रीलंकेचेच कुमार धर्मसेना व दक्षिण आफ्रिकेचे मरायस इरॅस्मस हे भूमिका पार पाडताना दिसतील. विशेष म्हणजे हे दोन्ही पंच नजीकच्या काळात काहीसे वादग्रस्त ठरले आहेत. धर्मसेना यांनी 2019 वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सहा अतिरिक्त धावा देण्याचा वादग्रस्त निर्णय दिला होता. तर, सध्या सर्वात अनुभवी पंच असलेल्या इरॅस्मस यांनी याच विश्वचषकात दोन वादग्रस्त नो बॉल दिले होते.
धर्मसेना व इरॅस्मस यांच्यानंतर तिसरे पंच व चौथे पंच म्हणून अनुक्रमे न्यूझीलंडचे ख्रिस गॅफनी आणि ऑस्ट्रेलियाचे पॉल रायफल हे जबाबदारी सांभाळताना दिसणार आहेत.
एमसीजीवर होणारा हा अंतिम सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी दीड वाजता सुरू होईल. या सामन्यावर पावसाचे सावट असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात येत आहे. मात्र, अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस असल्याने निकालाची अपेक्षा चाहते करत आहेत. राखीव दिवशी देखील सामन्याचा निकाल न लागल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद बहाल करण्यात येईल. (ICC Announced Officials For T20 World Cup Final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
करोडोंची फी घेऊनही द्रविड देऊ शकला नाही रिझल्ट! वाचा वर्षभरातील कामगिरी
‘बिलियन डॉलर इंडस्ट्रीचा संघ मागेच राहिला अन् आम्ही…’, पीसीबी अध्यक्षांनी भारताच्या जखमेवर चोळलं मीठ