आयसीसीनं टी20 विश्वचषक 2024 साठी ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’ची घोषणा केली आहे. या संघात भारतीय खेळाडूंचा दबदबा असून एकूण 11 पैकी 6 भारतीय खेळाडूंनी यात स्थान मिळवलंय. मात्र, या संघात स्टार फलंदाज विराट कोहलीचा समावेश करण्यात आलेला नाही. याशिवाय अफगाणिस्तानच्याही 3 खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि अफगाणिस्तानचा रहमानुल्ला गुरबाज यांची या संघात सलामीवीर म्हणून निवड करण्यात आली. रोहित शर्मानं विश्वचषकाच्या 8 सामन्यात 156 च्या स्ट्राईक रेटने 257 धावा केल्या असून, रहमानउल्ला गुरबाजनं 124 च्या स्ट्राईक रेटनं 281 धावा केल्या आहेत.
निकोलस पूरन, सूर्यकुमार यादव आणि मार्कस स्टॉयनिस यांचा मधल्या फळीत समावेश करण्यात आलाय. पूरननं 7 सामन्यात 228 धावा, सूर्यकुमार यादवनं 199 धावा आणि मार्कस स्टॉयनिसनं 169 धावा केल्या आहेत. तसेच भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यालाही संघात स्थान मिळालं आहे. त्यानं स्पर्धेत 144 धावा करण्यासोबतच 11 विकेट्स घेतल्या आणि टीम इंडियाला चॅम्पियन बनवण्यात मोलाचा वाटा उचलला.
भारताचा अक्षर पटेल आणि अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान यांची आयसीसी टीम ऑफ द टूर्नामेंटमध्ये फिरकीपटू म्हणून निवड झाली आहे. अक्षर पटेलनं या स्पर्धेत 92 धावा करण्यासोबतच 9 विकेट्सही घेतल्या. तर राशिद खाननं त्याच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानला प्रथमच उपांत्य फेरीत नेलं. त्यानं 8 सामन्यात 14 विकेट घेतल्या.
या संघात जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि फजलहक फारुकी यांची वेगवान गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. अर्शदीप सिंग आणि फजलहक फारुकी यांनी या स्पर्धेत सर्वाधिक (17) विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराहनं 15 विकेट घेतल्या आहे. विशेष म्हणजे, बुमराहचा इकॉनॉमी रेट फक्त 4.17 होता. 12वा खेळाडू म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या ॲनरिक नॉर्कियाची निवड करण्यात आली आहे.
आयसीसी 2024 टी20 विश्वचषक ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’ पुढीलप्रमाणे –
रोहित शर्मा (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), निकोलस पूरन, सूर्यकुमार यादव, मार्कस स्टॉयनिस, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, राशिद खान, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, फजलहक फारुकी, ॲनरिक नॉर्किया (12वा खेळाडू)
महत्त्वाच्या बातम्या –
संसदेतही रोहित शर्माच्या नावाचा जयघोष, अध्यक्षांसह संपूर्ण सभागृहानं केलं अभिनंदन
विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघावर पैशांचा वर्षाव! जय शाह यांनी केली मोठी घोषणा
निवृत्तीनंतर दिनेश कार्तिकचं पुनरागमन, आयपीएल 2025 साठी आरसीबीनं सोपवली मोठी जबाबदारी!