टी20 वर्ल्ड कप 2026(icc T20 international world cup 2026) च्या फायनलमध्ये न्यूझीलंडला 96 धावांनी हरवून टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद आपल्या नावावर केले. भारतीय संघ चॅम्पियन बनल्यानंतर ICC ने या वर्ल्ड कपसाठी ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’ची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या संघात 4 भारतीय खेळाडूंना जागा दिली आहे. पण तिथे सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा सारख्या खेळाडूंना स्थान दिलेले नाही. त्यांनी आपल्या संघात भारताव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडच्या दोन-दोन खेळाडूंचा समावेश केला आहे. तर पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेच्या एका-एका खेळाडूला जागा दिली आहे.
आयसीसीने आपल्या संघात ओपनर म्हणून पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानसोबत टीम इंडियाच्या संजू सॅमसनला (Sanju Samson) जागा दिली आहे. साहिबजादा फरहान या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. तर टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज ईशान किशन (Ishaan kishan) तिसऱ्या क्रमांकावर संघात सामील आहे. ईशान या स्पर्धेत चौथा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. टूर्नामेंटच्या ग्रुप स्टेजमध्ये शानदार गोलंदाजी करणाऱ्या यूएसएच्या शॅडली वॅन शालक्विकलाही 12 वा खेळाडू म्हणून आयसीसीने आपल्या संघात स्थान दिले आहे.
आयसीसीने टी20 वर्ल्ड कप 2026 च्या ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’साठी खेळाडूंची निवड त्यांच्या कामगिरीच्या आधारावर केली आहे. आयसीसीच्या या संघात भारताचे चार खेळाडू सामील आहेत. संजू सॅमसन आणि ईशान किशनसोबतच हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराहला या संघात जागा मिळाली आहे. या चारही खेळाडूंनी या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
झिम्बाब्वेच्या संघाने या टी20 वर्ल्ड कपमध्ये आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. त्यांचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझाराबानी यालाही या संघात जागा मिळाली. तर इंग्लंडचे दोन खेळाडू विल जॅक्स आणि आदिल रशीद हे देखील या संघात आपली जागा बनवण्यात यशस्वी ठरले आहेत. विल जॅक्सने या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडला सेमीफायनलपर्यंत पोहोचवण्यात मोठी भूमिका बजावली होती. तर आदिल रशीदने देखील या वर्ल्ड कपमध्ये चेंडूने उत्कृष्ट कामगिरी केली होती.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम (Aiden Markram) देखील ICC च्या ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’मध्ये आपली जागा बनवण्यात यशस्वी ठरला, तर त्याचा सहकारी खेळाडू लुंगी एनगिडी यालाही आयसीसीने आपल्या संघात जागा दिली आहे. विशेष बाब म्हणजे आयसीसीने मार्करमची आपल्या संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. तर वेस्ट इंडिजचा ऑलराउंडर जेसन होल्डर देखील या संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला. त्याने 7 सामन्यांत 10 विकेट्स आपल्या नावावर केल्या.
आयसीसीद्वारे निवडलेली टीम ऑफ द टूर्नामेंट
साहिबजादा फरहान, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन, एडन मार्करम (कर्णधार), हार्दिक पांड्या, विल जॅक्स, जेसन होल्डर, जसप्रीत बुमराह, लुंगी एनगिडी, आदिल रशीद, ब्लेसिंग मुझाराबानी, शॅडली वॅन शालक्विक (12 वा खेळाडू).






