येत्या 19 फेब्रुवारीपासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. यंदा पाकिस्तान या स्पर्धेचं यजमानपद भूषवणार आहे. परंतू भारताचे सामने पाकिस्तानमध्ये न खेळवता दुबई येथे खेळले जातील. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा नुकतीच करण्यात आली. त्यानंतर यंदाची ट्रॉफी कोणाच्या नावावर होते? याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. आतापर्यंत कोण-कोणत्या संघांनी ही ट्रॉफी जिंकली, याचा आढावा आपण या बातमीतून घेऊया.
दक्षिण आफ्रिका (1998) – पहिली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 1998 मध्ये बांगलादेशमध्ये खेळवण्यात आली होती. फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडिजचा 4 विकेटनं पराभव करून विजेतेपद पटकावलं होतं.
न्यूझीलंड (2000) – दुसरी चॅम्पियन्स ट्रॉफी केनियामध्ये आयोजित करण्यात आली होती. फायनलमध्ये न्यूझीलंडनं भारताचा 4 विकेटनं पराभव केला होता.
भारत-श्रीलंका (2003) – तिसरी चॅम्पियन्स ट्रॉफी श्रीलंकेत आयोजित करण्यात आली होती. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारत आणि सनथ जयसूर्याच्या नेतृत्वाखालील श्रीलंका यांना स्पर्धेचे संयुक्त विजेते घोषित करण्यात आलं होतं. स्पर्धेचा अंतिम सामना पावसामुळे होऊ शकला नव्हता.
वेस्ट इंडिज (2004) – 2004 मध्ये इंग्लंडमध्ये आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं इंग्लंडचा 2 विकेटनं पराभव करून विजेतेपद पटकावलं होतं.
ऑस्ट्रेलिया (2006 आणि 2009) – 2006 मध्ये भारतात आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी ऑस्ट्रेलियाच्या संघानं जिंकली होती. स्पर्धेचा अंतिम सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला गेला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियानं 2009 मध्ये सलग दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली. या स्पर्धेचं आयोजन दक्षिण आफ्रिकेत करण्यात आलं होतं. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कांगारुंनी न्यूझीलंडचा 6 विकेटनं पराभव केला होता. यासह ऑस्ट्रेलिया सलग दोन वेळा ही स्पर्धा जिंकणारा पहिला संघ ठरला.
भारत (2013) – महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतानं 2013 मध्ये इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत विजय मिळवला. टीम इंडियानं अंतिम फेरीत इंग्लंडचा 5 धावांनी पराभव केला होता.
पाकिस्तान (2017) – चॅम्पियन्स ट्रॉफीची आठवी आवृत्ती इंग्लंड मध्ये खेळवण्यात आली होती. फायनलमध्ये पाकिस्ताननं भारताचा 180 धावांनी पराभव करत पहिल्यांदा ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.
सर्वाधिक विजेतेपद – आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलियानं प्रत्येकी 2 वेळा ही ट्रॉफी जिंकली आहे.
हेही वाचा –
मोहम्मद सिराजला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात स्थान का मिळालं नाही? रोहित म्हणाला…
752 ची सरासरी, तरीही दुर्लक्ष! करुण नायरच्या हाती पुन्हा एकदा निराशा
हॅरी ब्रूक, जयस्वालसह हे चार फलंदाज ‘फॅब-4’ ची पुढील पिढी, माजी दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया