सध्या भारत आणि बांगलादेश या संघामध्ये एकदिवसाय सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना रविवारी (दि. 4 डिसेंबर) ढाका येथे खेळला गेेला. या सामन्यात बांगलादेश संघाने अक्षरशः भारतीय संघाच्या जबड्यातून विजय हिसकावला. अखेरच्या जोडीने नाबाद 54 धावांची भागीदारी करत बांगलादेशला एक गडी राखून विजय मिळवून दिला. या मानहानीकारक पराभवानंतर भारतीय संघाला आणखी एक धक्का बसला आहे.
पहिल्या वनडेमध्ये अगदी हातात तोंडाशी आलेला विजयाचा घास भारतीय संघाला मिळाला नाही. या पराभवानंतर भारतीय संघ मालिकेत पिछाडीवर पडला आहे. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीनेही षटकांची गती कमी राखल्याने भारतीय संघाला दंड ठोठावला.
भारतीय संघाने या सामन्यात निर्धारित वेळेत चार षटके कमी टाकली. त्यामुळे भारतीय संघाला मॅच फीच्या 80 टक्के रकमेचा दंड शिक्षा म्हणून ठोठावला गेला. सामनाधिकारी रंजन मदुगले यांनी ही कारवाई केली. कर्णधार रोहित शर्मा याने ही चूक कबूल केली आहे.
या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, भारतीय संघाला या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळाली होती. मात्र, बांगलादेशचा अनुभवी अष्टपैलू शाकिब अल हसन याने पाच बळी मिळवत भारतीय संघाची वाताहात केली. केएल राहुल याने भारतासाठी सर्वाधिक 73 धावा केल्या. त्याच्या या योगदानामुळे भारतीय संघ 186 पर्यंत मजल मारू शकला होता. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेश संघ भारतीय गोलंदाजां पुढे टिकू शकला नाही. त्यांचे 9 गडी 136 धावांवरच परतले होते. मात्र, अखेरच्या जोडीने नाबाद अर्धशतकी भागीदारी करत बांगलादेशला मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.
मालिकेतील दुसरा सामना 7 डिसेंबर रोजी मिरपूर येथे खेळला जाईल. हा सामना जिंकून मालिका बरोबरीत आणण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.
(ICC Fined Team India For Slow Over Rate In First ODI Against Bangladesh)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिषभ स्वतः संघातून बाहेर पडला? बांगलादेशमधून आली धक्कादायक माहिती समोर
राष्ट्रीय संघाकडून सुट्टी मिळाली असताना सूर्यकुमार डॉमेस्टिकमध्ये करणार धमाका, एमसीए अधिकाऱ्याची माहिती