आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने गुरुवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. आयसीसीने घोषित केले आहे की यंदा ५ वेगवेगळ्या युगातील क्रिकेटमधील १० दिग्गजांचा आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला जाईल. त्यामुळे या वर्षी आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये असणाऱ्या एकूण क्रिकेटपटूंची संख्या १०३ होईल.

आयसीसीने हा निर्णय पहिल्या वहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना होण्यापूर्वी घेतला आहे. हा अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात साउथॅम्पटन येथे १८ ते २२ जून दरम्यान होणार आहे. त्यामुळे विशेष हॉल ऑफ फेमची घोषणा आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना असा योग जुळून आला आहे.

सध्या आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये ९३ माजी क्रिकेटपटूंचा समावेश आहे. त्यात आता कसोटी क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या एकूण १० दिग्गजांचा समावेष केला जाणार आहे. प्रत्येक युगातील २ दिग्गज असा सन्मान करण्यात येईल.

याबद्दल आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योऱ अलारडायस यांनी म्हटले की ‘साउथॅम्टनमध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी १० दिग्गज क्रिकेटपटूंचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश करणे आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.’

आयसीसीने ५ वेगवेगळ्या युगांची विभागणी केली आहे. यामध्ये क्रिकेटमधील सुरुवातीचे युग (१९१८ पूर्वीचे), दोन महायुद्धांदरम्यानचे युग (१९१८-१९४५), महायुद्धानंतरचे युग (१९४६-१९७०), वनडे युग (१९७१-१९९५) आणि अधुनिक युग (१९९६-२०१६) अशा ५ युगांचा समावेश आहे. या ५ युगांमधून प्रत्येकी २ दिग्गजांचा समावेश हॉल ऑफ फेममध्ये केला जाईल.

या १० दिग्गज क्रिकेटपटूंच्या नावाची घोषणा १३ जून रोजी आयसीसीच्या डिजिटल मीडिया चॅनेल, तसेच फेसबुक आणि युट्यूबवर भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६ वाजता केली जाईल.

या १० दिग्गजांच्या निवडीसाठी मतदान होईल. हे मतदान आयसीसी हॉल ऑफ फेम वोटिंग ऍकेडमी, हॉल ऑफ फेममधील हयात असलेले सदस्य, एफआयसीएचे प्रतिनिधी, प्रख्यात क्रिकेट पत्रकार आणि आयसीसीमधील वरिष्ठ सदस्य करतील.