---Advertisement---

टेस्ट चॅम्पियनशीप २०२१-२३: भारत ‘या’ सहा संघाविरुद्ध करणार दोन हात, पाहा कसे दिले जाणार यंदा गुण

---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी (१४ जुलै) कसोटी अजिंक्यपद २०२१-२०२३ स्पर्धेसाठी असणाऱ्या गुण पद्धतीची आणि वेळापत्रकाची घोषणा केली आहे. काहीदिवसांपूर्वीच पहिल्या-वहिल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला होता. या सामन्यात न्यूझीलंडने भारताला पराभूत करत कसोटीचे विश्वविजेतेपद जिंकले होते. आता आयसीसीने या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा केली असून २०२१-२०२३ या कालावधीत दुसरे पर्व खेळले जाणार आहे.

असे दिले जातील गुण 
ही चॅम्पियनशीप स्पर्धा आयसीसीचे कसोटी सदस्य असणाऱ्या १२ देशांपैकी ९ देशांच्या संघात पार पडणार आहे. यामध्ये भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश आणि वेस्ट इंडीज या ९ देशांचा समावेश आहे.

तसेच ९ संघांना प्रत्येकी ८ प्रतिस्पर्ध्यांपैकी ६ संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळाव्या लागणार आहे. यामध्ये तीन मालिका घरच्या मैदानावर तर तीन मालिका परदेशात खेळायच्या आहेत. या मालिका २ ते ५ सामन्यांच्या असतील. या मालिका साखळी फेरीत खेळल्या जातील. त्यानंतर गुणतालिकेतील अव्वल २ संघ अंतिम सामना खेळतील. साखळी फेरीतील मालिका ३१ मार्च २०२३ पर्यंत संपतील.

या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यासाठी सारखेच गुण असणार आहे. यापूर्वी पहिल्या पर्वात प्रत्येक मालिकेसाठी सारखे गुण होते. मात्र, त्यावर बरेच वाद झाल्याने अखेर दुसऱ्या पर्वासाठी गुणपद्धतीत बदल करत प्रत्येक सामन्यासाठी समान गुण ठेवण्यात आले आहेत.

नव्या गुणपद्धतीनुसार कसोटी अंजिक्यपद स्पर्धा २०२१-२०२३ साठी प्रत्येक सामन्यासाठी १२ गुण असणार आहे. म्हणजेच सामना जिंकणाऱ्या संघाला पूर्ण १२ गुण मिळतील. तसेच जर सामना अनिर्णित राहिला तर दोन्ही संघांना प्रत्येकी ४ गुण दिले जातील. तर सामना जर बरोबरीत सुटला तर दोन्ही संघांना प्रत्येकी ६ गुण मिळतील. त्याचबरोबर सामना जिंकणाऱ्या संघाची गुणांची टक्केवारी १०० असेल, तर सामना अनिर्णित राहिल्यास ही टक्केवारी ३३.३३ अशी होईल. सामना बरोबरीत सुटल्यास ही टक्केवारी ५० असेल.

तसेच २ सामन्यांच्या मालिकेसाठी एकूण २४ गुण असतील, तर ३ सामन्यांच्या मालिकेसाठी ३६ गुण, ४ सामन्यांच्या मालिकेसाठी ४८ गुण आणि ५ सामन्यांच्या मालिकेसाठी ६० गुण असतील.

भारतीय संघ या संघांविरुद्ध खेळणार मालिका
भारताला कसोटी अजिंक्यपद २०२१-२०२३ स्पर्धेत श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानांवर मालिका खेळायच्या आहेत. तर इंग्लंड, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध परदेशात मालिका खेळायच्या आहेत. भारतीय संघ या स्पर्धेची सुरुवात इंग्लंड दौऱ्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेने करेल. ही कसोटी मालिका ४ ऑगस्टपासून सुरु होणार आहे.

या स्पर्धेत इंग्लंडसंघ सर्वाधिक २१ कसोटी सामने खेळेल. तर भारत १९, ऑस्ट्रेलिय १८, दक्षिण आफ्रिका १५ कसोटी सामने खेळणार आहे. तसेच न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका प्रत्येकी १३ कसोटी सामने खेळेल आणि पाकिस्तान १४ व बांगलादेश १२ कसोटी सामने खेळेल.

महत्त्वाच्या बातम्या – 

आयसीसी वनडे क्रमवारीमध्ये मिताली राजला फटका; ‘या’ खेळाडूने गाठले अव्वल स्थान

भारत-श्रीलंका मालिकेसाठी ‘हे’ पाच पंच करणार पंचगिरी, कुमार धर्मसेना यांचाही समावेश

अगग! चेंडू गरकन् फिरला अन् फलंदाजाला कळायच्या आत बत्त्या गुल; अनेकांना झाली वॉर्नची आठवण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---