भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ चा उर्वरित हंगाम संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे करण्याचे निश्चित केले आहे. भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ४ मे रोजी चौदावा हंगाम २९ सामन्यांनंतर स्थगित केला गेला होता. आयपीएल भारताबाहेर गेल्यानंतर आगामी टी२० विश्वचषक देखील इतरत्र खेळवण्यात येणार का याबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) महत्वपूर्ण बैठक मंगळवारी (१ जून) दुबई येथे पार पडणार आहे.
बैठकीत भारतातर्फे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली व सचिव जय शहा सहभागी होऊ शकतात. तसेच, आयपीएलच्या आयोजनाबाबत चर्चेसाठी आयपीएल चेअरमन राजीव शुक्ला व ब्रिजेश पटेल हेदेखील दुबईला रवाना झाले आहेत. आयसीसीच्या या महत्त्वपूर्ण बैठकीत कोणकोणत्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा होईल याबाबत घेतलेला हा आढावा.
१) टी२० विश्वचषकाचे आयोजन कोठे होणार?
नियोजित कार्यक्रमानुसार आयसीसी टी२० विश्वचषकाचे आयोजन भारतात होणे अपेक्षित आहे. मात्र, दररोज देशांमध्ये लाखोंच्या संख्येने कोरोना रुग्ण आढळत असल्याने आयसीसी याबाबत बीसीसीआयला परवानगी देणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. बीसीसीआय आयसीसीकडे वेळ मागेल. परंतु, त्याच वेळी भारताला पर्याय म्हणून युएईचा विचार देखील केला जाईल.
२) यजमानपद कोणाकडे राहणार?
जर विश्वचषकाचे आयोजन युएईत झाले तर, कागदोपत्री यजमानपद कोणाकडे राहणार हे महत्त्वपूर्ण ठरेल. यजमानपद भारताकडे राहिले तर बीसीसीआय युएई क्रिकेट बोर्डाला मोठी रक्कम देईल. विश्वचषकातील एका सामन्याच्या आयोजनासाठी आयोजक देशाला २ कोटी रक्कम मिळते. या विश्वचषकात ४५ सामने खेळले जाणार असून यातून ९० कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे.
३) टॅक्स सवलतीचा मुद्दा
बीसीसीआय आणि आयसीसी टॅक्सच्या मुद्द्यावरून २०१६ टी२० विश्वचषकापासून समोरासमोर आले आहेत. त्यावेळी टॅक्समध्ये सवलत न दिल्याने आयसीसीने बीसीसीआयचा निधी रोखला होता, ज्याला पुढे वादविवाद समितीकडे मांडण्यात आलेले. विश्वचषक भारतात झाला आणि केंद्र सरकारने टॅक्समध्ये १०% सूट दिली तर बोर्डाला २२६ कोटी रुपये चुकवावे लागतील. कोणतीही सवलत मिळाली नाही तर हा आकडा ९०६ कोटी इतका मोठा होईल.
४) पाकिस्तान भारतात खेळणार का?
विश्वचषकाचे आयोजन भारतात झाले तर, पाकिस्तान स्पर्धेत सहभाग होणार का? यावर मोठी गहन चर्चा होईल. दोन्ही देशांमधील राजकीय संबंध ताणले गेल्याने २०१२-२०१३ पासून उभय देशांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळली नाही. पाकिस्तान २०१६ विश्वचषक खेळण्यासाठी भारतात आला होता.
५) चौदा संघांविषयी होऊ शकते चर्चा
विश्वचषकात १४ संघ खेळणेविषयी या बैठकीत चर्चा होऊ शकते. तसेच, २०२३-२०३१ या काळातील फ्युचर टूर प्रोग्रामबाबत विचार केला जाऊ शकतो. आयसीसी दरवर्षी एक मोठी स्पर्धा खेळवू इच्छिते. याला बीसीसीआय, क्रिकेट ऑस्ट्रेलिया व इंग्लंड क्रिकेट संघटनेचा विरोध आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाला जाणवेल हार्दिक पंड्याची कमी”
“देशापुढे वैयक्तिक मुद्दे गौण”, ‘त्या’ वादावर मितालीने टाकला पडदा
आर्चर बाबा की जय! आयपीएल पुनरागमनाच्या घोषणेनंतर ६ वर्षांपूर्वीचे ‘हे’ ट्विट व्हायरल