---Advertisement---

T20 WC: पहिल्याच सामन्याला मुकणार ‘हा’ मोठा खेळाडू! खुद्द चीफ सिलेक्टर्सने सांगितले कारण

On: सोमवार, जानेवारी 19, 2026 3:02 PM
Pat-Cummins-And-Glenn-Maxwell
---Advertisement---

फेब्रुवारीपासून क्रिकेटविश्वात पुरूषांच्या टी२० विश्वचषकाला सुरूवात होणार आहे. यासाठी सर्व संघाचे खेळाडू तयारीला लागले असून बलाढ्य ऑस्ट्रेलियाला मात्र मोठा धक्का बसला आहे. त्यांचा महत्वाचा एक खेळाडू स्पर्धेच्या सुरूवातीला काही सामने खेळणार नाही असे मुख्य संघनिवड अधिकारी जॉर्ज बेली यांनी सांगितले आहे.

टी२० विश्वचषक २०२६च्या आधीपासूनच ऑस्ट्रेलियाला एका पाठोपाठ एक धक्के बसत आहेत. त्यांचे अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. अशा स्थितीत त्यांचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स या स्पर्धेच्या पहिल्या काही सामन्यांना मुकणार आहे, असे बेलीने सांगितले आहे.

कमिन्स या स्पर्धेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या सामन्यापासून ऑस्ट्रेलियासाठी उपलब्ध असणार आहे. त्याची दुखापत अजूनही ठीक झाली नसल्याने तो पहिला सामना खेळणार नाही. कमिन्सला २०२५-२६ ऍशेस मालिकेच्या आधीच दुखापत झाली होती. तरीही त्याने या मालिकेतील एक सामना खेळला. ज्यामध्ये त्याने ६ विकेट्स घेतल्या होत्या.

तसेच कमिन्स ऍशेस मालिकेतील ५ पैकी ४ सामन्यात संघाबाहेरच होता. अशातच त्याची टी२० विश्वचषकासाठी संघात निवड झाली. आता तो या स्पर्धेच्या काही सामन्यांत खेळेल अशी शक्यता संघ निवडकर्त्यांनी दर्शवली आहे.

ऑस्ट्रेलिया विश्वचषकाआधी पाकिस्तानविरूद्ध टी२० मालिका खेळणार आहे. २९ जानेवारीपासून ही तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी कमिन्सला आराम दिला आहे. यासाठी संघ निवडल्यावर बेली म्हणाले, “कमिन्स विश्वचषकात काही सामन्यांनंतर संघात येईल. जर काही झाले तर त्यासाठी आम्ही तयार आहोत.”

पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने कमिन्सबरोबर अनेक अनुभवी खेळाडूंना आराम दिला आहे. त्यामध्ये ग्लेन मॅक्सवेल, टीम डेविड, जोश हॅजलवूड आणि नॅथन एलिस यांचा समावेश आहे. त्याचबरोबर डेविड आणि हॅजलवूड हे पण दुखापतीतून सावरत आहेत.

फेब्रुवारी ७ पासून विश्वचषकाला सुरूवात होत असून पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध नेदरलॅंड्स यांच्यात खेळला जाणार आहे. यासाठी ऑस्ट्रेलिया पाकिस्तानमधून थेट श्रीलंकेला रवाना होणार आहे. ज्यानंतर ते ११ फेब्रुवारीला आयर्लंडविरुद्ध कोलंबो येथे पहिला सामना खेळणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---