आगामी टी२० विश्वचषक २०२६मध्ये सध्या वॉर्म-अपचे सामने सुरू आहेत. या सामन्यांना दोन फेब्रुवारीपासून सुरूवात झाली आहे. पहिल्याच दिवशी तीन सामने खेळले गेले. ज्यामध्ये इंडिया ए, अफगाणिस्तान आणि इटली संघांनी विजय मिळवला. यामध्ये गतविजेता भारत एकमेव सामना खेळणार आहेत. हा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध असून तो मुंबईमध्ये खेळला जाणार आहे. ४ फेब्रुवारीला खेळला जाणारा सामना डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार असून तो कुठे आणि कसा पाहावा हे जाणून घेऊ.
भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग जिओ हॉटस्टार ऍपवर केले जाणार असून टिव्हीवर सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे. तसेच जिओ हॉटस्टार ऍपवर नेपाळ विरुद्ध युएई, अफगाणिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज, पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड, इंडिया ए विरुद्ध नामिबिया, इटली विरुद्ध युएई, नेपाळ विरुद्ध कॅनडा या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रिमिंग केले जाणार आहेत.
या स्पर्धेत भारताचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे सोपवले असून संघाची मागील टी२० मालिकांमधील कामगिरी पाहता चाहत्यांना त्यांच्याकडून पुन्हा एकदा विजेतेपदाची अपेक्षा आहे. मागील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेलाच पराभूत केले होते आणि दुसऱ्यांदा टी२० विश्वचषकाचे विजेतेपद जिंकले.
भारताने नुकतेच घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत ४-१ असा विजय मिळवला होता. त्यामध्ये भारतीय कर्णधाराबरोबर अभिषेक शर्मा, ईशान किशन, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवि बिश्नोई आणि अर्शदीप सिंग यांनी चांगली कामगिरी केली होती. बिश्नोई वगळता बाकी सर्व भारताच्या टी२० विश्वचषकाच्या संघाचा भाग असल्याने त्यांच्या कामगिरीवर विशेष लक्ष असणार आहे.
सूर्यकुमारही २०२४च्या टी२० विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता. त्यामध्ये त्याने घेतलेल्या डेविड मिलरचा झेल सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. आता तो संघाचा कर्णधार बनत विश्वचषक जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.
आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६साठी भारताचा संघ- सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंह, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, हर्षित राणा.






