क्रिकेटविश्वात सुरू असलेल्या आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६चा तिसऱ्या दिवसाची धमाक्यात झाली. यामध्ये स्पर्धेचा सातवा सामना सोमवारी (९ फेब्रुवारी) ग्रुप सी मधील स्कॉटलंड विरुद्ध ईटली असा खेळला गेला. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात स्कॉटलंडने सोपा असा ७३ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात ईटलीचा कर्णधार वेन मॅडसेनने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचा हा निर्णय चुकल्याचे लक्षात आले. कारण स्कॉटलंडने २०८ धावसंख्येचे लक्ष्य त्यांना दिले.
स्कॉटलंडकडून सलामीवीर जॉर्ज मुन्से आणि मायकल जोन्स यांनी विक्रमी शतकी भागीदारी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १३.५ षटकातच १२६ धावांची भागीदारी केली. ही या स्पर्धेतील एखाद्या असोसिएट संघाकडून सलामीची दुसरी सर्वोच्च भागीदारी ठरली आहे. जोन्सने ३७ धावा केल्या. जॉर्जने ५४ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने ८४ धावा केल्या.
यामध्ये ब्रेंडन मॅकमलनच्या १८ चेंडूत नाबाद ४१ धावांचा समावेश आहे. ईटलीकडून उत्तम गोलंदाजी अली हसनने केली. त्याने ४ षटकात २१ धावा देत एक विकेट घेतली. बाकीच्या गोलंदाजांचा स्कॉटलंडच्या फलंदाजांनी चांगलाच समाचार घेतला.
लक्ष्याचा पाठलाग करताना ईटलीने पहिल्याच चेंडूत जस्टीन मोस्काची विकेट गमावली. त्यानंतर मॅनेंटी भावांशिवाय ईटलीचा कोणताच फलंदाज अधिक काळ खेळपट्टीवर टिकला नाही. हॅरी मॅनेंटी आणि बेन मॅनेंटी यांनी चौथ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केली. हॅरीला मायकल लिस्कने बाद केले. तो २५ चेंडूत ३७ धावा करत बाद झाला.
तसेच बेनने ३१ चेंडूत ५२ धावा केल्या, मात्र त्याचे हे अर्धशतक वाया गेले. स्कॉटलंडकडून फिरकीपटू लिस्क प्रभावी गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकात १७ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. तोच या सामन्याचा सामनावीर ठरला.
लक्ष्याचा पाठलाग करताना ईटलीचा संघ १६.४ षटकात १३४ धावसंख्येवर गारद झाला. ईटली पहिल्यांदाच टी२० विश्वचषक खेळत आहे. त्यांच्यासाठी आणखी एक वाईट बातमी ती म्हणजे त्यांचा कर्णधार वेन मॅडसेनला क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झाला. त्याने लगेच मैदान सोडले होते. यामुळे तो या सामन्यात फलंदाजीलाही आला नाही. तसेच तो उर्वरित स्पर्धेत खेळण्याची शक्यताही कमी आहे.
स्कॉटलंड बांग्लादेशच्या जागी या स्पर्धेत खेळत आहे. बांग्लादेशने या स्पर्धेत खेळण्यास नकार दिल्याने स्कॉटलंडला संधी मिळाली. आता त्यांनी विजयाने स्पर्धेचा प्रारंभ केला आहे.






