---Advertisement---

टी20 वर्ल्डकपआधी टीम इंडियाची वाढली चिंता, प्रमुख वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त!

On: गुरूवार, फेब्रुवारी 5, 2026 10:34 AM
---Advertisement---

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषकाची दहावी आवृत्ती यंदा खेळली जाणार आहे. भारत आणि श्रीलंकामध्ये या स्पर्धेचे सामने खेळले जाणार असून त्याची सुरूवात ७ फेब्रुवारीपासून होणार आहे. सध्या यामधील सराव सामने सुरू आहेत. यातील भारताचा सराव सामना ४ फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाला. मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने ३० धावांनी विजय मिळवत चांगली सुरूवात केली, मात्र एका गोलंदाजाने या आनंदावर विरजण टाकले आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा गोलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाला. त्याने कसेतरी एक षटक टाकले. त्यातही त्याने १६ धावा दिल्या. सामन्यादरम्यान षटक टाकताना हर्षित दोनदा थांबला. त्यानंतर तो लंगडतच मैदानाबाहेर गेला. त्याची दुखापत किती गंभीर हे अजून समोर आलेले नाही. भारताला आधीच वॉशिंग्टन सुंदरच्या फिटनेस रिपोर्टची प्रतिक्षा असताना हर्षितने संघाच्या अडचणीत आणखी भर टाकली आहे.

सुंदर न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. सध्यातरी तो संघाबाहेर असून तो कधी परतणार याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्याचबरोबर भारताचा फलंदाज तिलक वर्मा पूर्णपणे तंदुरूस्त होत संघात परतला आहे. त्याने टी२० विश्वचषकातील दोन सराव सामनेही खेळले आहेत. त्याने दोन्ही सामन्यांमध्ये गोलंदाजीही केली असून युएसए विरुद्ध त्याने एक विकेटही घेतली होती.

तसेच अक्षर पटेललाही न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेत हाताला दुखापत झाली होती. त्यातून तो सावरला असून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यातही खेळला. यामध्ये त्याने एक षटक टाकताना दोन धावा देत एक विकेटही घेतली. या सामन्यात भारताने २० षटकात ६ विकेट्स गमावत २४० धावसंख्या उभारली होती.

या स्पर्धेत भारत पहिला सामना ७ फेब्रुवारीला युएसएविरुद्ध खेळणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

टी२० विश्वचषक २०२६साठी भारताचा संघ– सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंह,अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, हर्षित राणा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---